इस्लामाबाद : भारतातील पुलवामा हल्ल्यासह अनेक हल्ल्यांमागे हात असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर जिवंत असल्याचा दावा पाकिस्तानच्या माध्यमांनी केलाय. मसूदच्या जवळच्या नातेवाईकांच्या हवाल्यानं पाकिस्तान माध्यमांनी हे वृत्त दिलंय. मसूद अजहरचा मृत्यू झाल्यानं वृत्त चुकीचं असल्याचं 'जिओ उर्दु न्यूज'नं म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी संपूर्ण दिवसभर समाज माध्यमांवर मसूदचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. यकृताच्या कर्करोगानं मसूदचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, त्याबाबत कुठलीही पुष्टी मिळालेली नाही. आता या बातमीचं पाकिस्तानी मीडियानं स्पष्ट शब्दांत खंडन केलंय. मात्र मसूदच्या जवळच्या नातेवाईकांनी नाव न घेण्याच्या अटीवर तो जिवंत असल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलंय. मात्र, चॅनलनं त्याच्या स्वास्थ्यासंबंधी आणखी कोणतीही माहिती दिलेली नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अजहर मसूद याच्यावर सेनेच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत... त्याचे मूत्रपिंड काम करणं बंद झालंय. याशिवाय आणखी कोणतीही माहिती हाती लागलेली नाही.


ज्या मीडिया रिपोर्टमध्ये जैश-ए-मोहम्मदचा नेता अजहर मसूद मारला गेल्याचं म्हटलंय ते सर्व रिपोर्ट खोटे असल्याचा दावा 'जिओ उर्दू न्यूज'नं केलाय.


मसूद अजहर जिवंत असल्याचा 'जैश'चाही दावा आहे. मसूद अझहर बालाकोटच्या हल्ल्यात मारला गेला का? याबाबत उलट सुलट माहिती पुढे येत आहे. गुप्तचर विभागतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामा हल्ल्यानंतर मसूद अजहर सतत आपली ठिकाणं बदलत होता. त्याची प्रकृती ठीक नसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडे आधीपासूनच आहे. म्हणूनच पाकिस्तानातील भवालपूरमधून उपचारासाठी मसूदला हलवण्यात आल्याचंही पुढे आलं. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाहा महमूद कुरेशी यांनी तशी कबुलीही दिली होती. पण २६ फेब्रुवारीच्या रात्री मसूद बालाकोटमध्ये होता की नाही? याबाबत कुठलाही खात्री लायक माहिती मिळालेली नाही.


मसूद अजहर हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. २४ डिसेंबर १९९९ रोजी 'आयसी ८१४' या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले त्या वेळी प्रवाशांच्या बदल्यात ३१ डिसेंबर १९९९ रोजी मौलान मासूद अझरची भारतीय तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. 


त्यानंतर पाकिस्तानात परत येताच त्याने जैश ए मोहम्मद या संघटनेची स्थापना केली. तसंच १३ डिसेंबर २००१ रोजी भारताच्या संसदेवर करण्यात आलेल्या हल्ल्यात नऊ सुरक्षा जवान ठार झाले होते. त्यातही मसूदचाच हात होता. भारताकडे अजहरच्या मृत्यूबाबत अधिकृत माहिती नाही. केवळ तो आजारी असून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.