लखनऊ: लोकसभा निवडणुकीचे मतदान निर्णायक टप्प्यात असताना आता उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मायावती आणि अखिलेश यादव यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते बुधवारी बाराबंकी येथील प्रचारसभेत बोलत होते. मायावती आणि अखिलेश यादव यांचा कंट्रोलर नरेंद्र मोदींच्या हातात आहे. त्यामुळे एक ध्यानात ठेवा की, निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी अखिलेश व मायावती यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतात. मात्र, ते माझ्यावर दबाव आणू शकत नाहीत, असे राहुल यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात बसपा आणि समाजवादी पक्षाने युती केली आहे. या दोन्ही पक्षांनी युतीपासून काँग्रेसला जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. त्यामुळे आता राहुल यांच्या आरोपानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 



दुसरीकडे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका यांनी मात्र भाजपविरोध हाच आपला एकमेव अजेंडा असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रियंका गांधी बुधवारी सोनिया गांधी यांच्या प्रचारासाठी रायबरेलीमध्ये आल्या होत्या. तेव्हा पत्रकारांनी त्यांच्यासमोर काँग्रेसमुळे उत्तर प्रदेशात सपा-बसपा यांचेही नुकसान होईल, अशी शंका उपस्थित केली. मात्र, प्रियकांनी हा दावा फेटाळून लावला. हे कदापि घडणार नाही. काँग्रेस केवळ भाजपची मते कापेल. काँग्रेस पक्ष केवळ पंतप्रधानपदाच्या अपेक्षेने निवडणूक लढवत नाही. सामान्य जनतेच्या भल्यासाठी काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे, असेही प्रियंका यांनी सांगितले.