नवी दिल्ली : प्रियंका गांधी हे वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण अखेर काँग्रेसनं अजय राय यांना वाराणसीतून उमेदवारी घोषित करत यावर पूर्णविराम लावला. मात्र निवडणूक लढण्यापासून त्यांना कोणी रोखलं याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांना निवडणूक न लढवण्य़ास सांगितलं अशी याआधी चर्चा होती. मोठ्या नेत्यांविरोधात गांधी परिवारातून कोणीही निवडणूक लढवणार नाही अशी प्रथा नेहरूंनी आणली होती. त्यामुळेच त्यांनी निवडणूक लढवली नाही. असं देखील बोललं जातं होतं. पण आता आणखी एक कारण समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका गांधी यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवण्यास बसपा अध्यक्षा मायावती यांचा विरोध होता. काँग्रेसचे रणनीतीकार मायावतींच्या संपर्कात होते. मोदींच्या विरोधात विरोध पक्षाचा चेहरा म्हणून प्रियंका गांधी यांना पुढे केलं जाणार होतं. यासाठी अखिलेश यादव हे देखील तयार झाले होते. पण मायावती यांचा निर्णय काय असेल यावर अनेक गोष्टी अवलंबून होती. पण मायावती यांना याला नकार दिला आणि काँग्रेसचा संपूर्ण खेळ बिघडला.


मायावती यांना असं वाटत होतं की, जर प्रियंका गांधी यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवली तर पूर्व भागात काँग्रेसच्या बाजुने वातावरण तयार होईल. ज्यामुळे सपा-बसपा आघाडीला फटका बसेल. मायावती यांना ही जोखीम घ्यायची नव्हती. सपा-बसपाने अमेठी आणि रायबरेलीमध्ये उमेदवार दिला नाही. पण वाराणसीमध्ये जर प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवली असती. आणि सपा-बसपाने जर उमेदवार दिला तर याचं नुकसान काँग्रेसला झालं असतं.


मायावती यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसने अनेक प्रयत्न केले. पण काही फायदा झाला नाही. सपा-बसपाने शालिनी यादव यांना उमेदवारी दिली आहे. शालिनी यादव या काँग्रेसचे माजी खासदार श्यामलाल यादव यांची सून आहे. 


२०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांना ५,८१,०२२ मते मिळाली होती. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपकडून अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत होते. त्यांना ३ लाख ७७ हजार मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना ७५,६१४ मतं मिळाली. सपाच्या उमेदवाराला ४५,२९१ मते तर बसपाच्या उमेदवाराला ६०,५७९ मते मिळाली होती. सपा-बसपा आणि काँग्रेसचे मते एकत्र केली तर ३ लाख ९० हजार ७२२ मते होतात.