अलवार: आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मायावती या देशाच्या पंतप्रधान होतील, असे भाकीत माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी वर्तविले आहे. ते रामगढ येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आगामी निवडणुकीत विरोधकांच्या महाआघाडीचा विजय होईल. अशावेळी देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता मायावती पंतप्रधानपदाच्या प्रबळ उमेदवार असल्याचे नटवर सिंह यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलवर येथील रामगड विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर नटवर सिंह यांचा मुलगा जगत सिंह निवडणूक लढवत आहे. त्याच्या प्रचारासाठी नटवर सिंह रामगढमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नटवर सिंह यांनी म्हटले की, लोकसभेला काँग्रेसला केवळ ८० ते ९० जागा मिळतील. त्यामुळे राहुल गांधी यांना पंतप्रधान होता येणार नाही. मायावती यांना तुलनेत अधिक संधी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजून दक्षिण भारतही पुरता समजलेला नाही. कारण त्यांच्याकडे कोणताच दृष्टीकोन नाही. तीन राज्यातील पराभवानानंतर मोदींची प्रतिमा ढासळली आहे. राज्याचे नेतृत्व करणे वेगळे आणि देशाचे नेतृत्व करणे वेगळे असते, असे नटवर सिंह यांनी म्हटले.



गेल्या आठवड्यात कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या सभेच्यानिमित्ताने विरोधक एकत्र आले होते. परेड ग्राउंडवर ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने झालेल्या सभेला सुमारे ८ लाख लोक हजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, भाजपचे खा. शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह वाजपेयी सरकारधील अरुण शौरी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह या सभेला उपस्थित होते.