लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याची झलक कर्नाटक निवडणुकीच्यावेळी दिसून आली. अनेक नेते एकाच व्यासपीठावर दिसून आलेत. दरम्यान, उत्तर प्रदेशात महाआघाडीत बिघाडीला सुरुवात झाली आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांनी बुधवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन आघाडीबाबत घोषणा केली. यावेळी दिग्विजय सिंग यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यावर त्यांनी निशाणा साधला. याचाच अर्थ हे नेते मायावतींना नकोस असल्याचे मानले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी देशभरात महाआघाडी होण्याची गरज आहे. तशी चाचपणी सुरु झाली. मध्यप्रदेशसह चार राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या राज्यात दिग्विजय सिंग यांच्यासारखे काही नेते काँग्रेस आणि बसपाच्या आघाडीच्या आड येत आहेत. काँग्रेस बसपा आघाडी होऊ नये, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असा हल्लाबोल बसपाकडून करण्यात आलाय.


दिग्विजय सिंग यांच्यासारख्या नेत्यांमुळेच आघाडी होत नसल्याचा आरोप मायावती यांनी केलाय. भाजप सरकार, सीबीआय आणि ईडीच्या भीतीने दिग्विजय़ आघाडीसाठी काहीही प्रयत्न करत नाही. आघाडीत खोडा घालून भाजपला फायदा करण्याचा त्यांचा हेतू आहे. बसपला संपविण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी आघाडीसाठी सकारात्मक आहेत. मात्र, काही स्वार्थी नेत्यांमुळे आघाडी होत नसल्याचा आरोपही मायावतींनी केला.