इंग्रजीमुळं भंग पावलं डॉक्टर बनण्याचे स्वप्न; MBBSच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल
Marathi News Today: खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
Marathi News Today: एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने सोमवारी सकाळी हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली आहे. विद्यार्थिनीजवळ कोणतीही सुसाइड नोटदेखील मिळाली नाहीये. मात्र, विद्यार्थिनीच्या वडिलांनी एक गंभीर दावा केला आहे. विद्यार्थिनीचे वडिल सरकारी शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, त्यांना कोणावर संशय घ्यायचा नाहीये. माझी मुलगी सतत चिंतेत असायची. कारण इंग्रजीतून मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी अडचणी येत होत्या. परीक्षेतही ती चांगले गुण मिळवू शकती नव्हती.
मध्य प्रदेशने ऑक्टोबर 2022मध्ये हिंदीतून एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू करणारे पहिले राज्य होते. मात्र, पीडीतेने तो पर्याय का निवडला नाही, हे मात्र समजू शकले नाही. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव राणी मोरे (21) असं आहे. खजुरी एसएचओ नीरज वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी खरगोन येथील झिरन्या येथील रहिवाशी आहे. तिने 2023मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खोलीत एकटीच होती. कारण तिची रुममेट घरी निघून गेली होती.
सोमवारी सकाळी 10 वाजले तरी राणी तिच्या खोलीतून बाहेर आली नव्हती. तेव्हा वॉर्डनने तिचा दरवाजा ठोठावला मात्र कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पोलिसांना याबाबत सूचना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडून ते आत गेले तेव्हा तिने आत्महत्या केल्याचे समोर आले. खोलीची तपासणी केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर तिच्या कुटुंबालाही या बाबत माहिती देण्यात आली.
राणीचे वडिल देवी सिंह मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती एक खूप चांगली विद्यार्थिनी होती. पण एकाच गोष्टीमुळं ती त्रासली होती ते म्हणजे तिला इंग्रजी माध्यमातून शिकण्यास कठिण जात होते. कारण तिने बारावीपर्यंत हिंदी माध्यमातून शिक्षण घेतले होते. परीक्षा झाल्यानंतरही तिला चांगले गुण मिळाले नव्हते. तेव्हा आम्हाला महाविद्यालयाने बोलवले होते. मात्र तेव्हा मी त्यांना आश्वासन दिलं होतं की माझी मुलगी पुढच्या वेळी चांगले गुण मिळवून आणेल. कारण तिने खूप संघर्ष करत एमबीबीएसला प्रवेश मिळवला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला कोणीही त्रास दिल्याचे काही माहिती समोर आलेली नाहीये. तिच्या खोलीची ही झडती घेण्यात आली पण काहीच संशयास्पद आढळलं नाही. तिच्या वडिलांनी सोमवारीच तिच्या खोलीतील तिचे कपडे आणि पुस्तक गोळा केली आहेत. त्यानंतर तिच्या गावी तिच्यावर अत्यसंस्कार होणार आहेत.