१० देशाच्या राजदुतांसोबत परराष्ट्र मंत्रालयाची दिल्लीत बैठक
बैठकीला जर्मनी, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, बेल्जियम सह इतर देशांचे राजदूत उपस्थित होते.
नवी दिल्ली : १० देशाच्या राजदुतांसोबत नवी दिल्लीत बैठक झाली आहे. भारताच्या परराष्ट्र खात्याच्या सचिवांनी १० देशांच्या राजदूतांना भारत पाकिस्तान तणावाची माहिती दिली आहे. या बैठकीला जर्मनी, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, बेल्जियम सह इतर देशांचे राजदूत उपस्थित होते. दिल्लीमध्ये बैठकांचा जोर सुरु आहे. बैठकांवर बैठका होत आहे. परराष्ट्र मंत्रालयात हालचाली सुरु आहेत. पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारताकडून पाऊलं उचलली जात आहे. पाकिस्तानने चर्चेचा प्रस्ताव जरी ठेवला असला तरी भारताने दहशवताद्यांविरोधात कारवाईनंतरच चर्चा होऊ शकते असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. जवानाला परत पाठवण्याच्या बदल्यात पाकिस्तानने काहीही अटी ठेवू नयेत असा इशारा देखील भारताने दिला आहे. भारताच्या पायलटला जर काही झालं तर भारत कारवाई करेल असं देखील भारताने पाकिस्तानला ठणकावलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, युएनमधील सर्व सदस्य देश भारतासोबत आहेत. चीनची भूमिका ही फक्त अस्पष्ट आहे. भारताने केलेल्या दहशतवादी कारवाई विरोधात कोणत्याच देशाने आवाज उठवलेला नाही. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आयबी, रॉ, गृह मंत्रालयाच्या मोठ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार भारत या गोष्टीवर ठाम आहे की, पाकिस्तानी लष्कर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं समर्थन करते.
पाकिस्तान आज सकाळपासून सीमेवर फायरिंग करत आहे. जम्मू-काश्मीरच्या सुंदरबनी, मनकोट, खारी करमारा आणि देगवारमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. भारतीय जवान देखील त्यांना चोख प्रत्यूत्तर देत आहेत.