नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातल्या सत्तास्थापनेचा ( Maharashtra Government) तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतल्या बैठकांचं सत्र आज अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेस ( Congress) आणि राष्ट्रवादीच्या ( NCP ) दिल्लीत स्वतंत्र बैठका सुरू आहेत. एकीकडे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तर पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. या दोन्ही बैठका आटोपल्यानंतर पवारांच्याच निवासस्थानी दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत खातेवाटपाबाबत आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. काँग्रेसच्या बैठकीला कालच्या नेत्यांव्यतिरिक्त राज्यातल्या इतर नेत्यांचाही समावेश आहे. तर पवारांच्या निवासस्थानी भुजबळ, जयंत पाटील आणि नवाब मलिक बैठकीसाठी दाखल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या निवासस्थानी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तासमीकरण, इलेट्रोल बाँड आणि इतर मुद्यांवर चर्चा कऱण्यात आली. काल राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालेल्या संयुक्त बैठकीतील माहिती सोनिया गांधींना देण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.  या बैठकीला अहमद पटेल, के. सी. वेणूगोपाल, अधीररंजन चौधरी, अंबिका सोनी, ए. के. अँटनी आणि अन्य काँग्रेस नेते उपस्थित होते.


महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकार


महाराष्ट्रात लवकरात लवकर स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलाय. तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना असे तीन पक्ष एकत्र करून सरकार बनवणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी तब्बल तीन तास सुरू असलेल्या बैठकीत महाशिवआघाडी सरकार स्थापनेबाबत सविस्तर चर्चा झाली. 


समन्वय समिती स्थापन करणार


दिल्लीत झालेल्या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सरकार स्थापन करताना आणि सरकार चालवताना तिन्ही पक्षांचा समन्वय राखण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली जाईल. बुलेट ट्रेनला विरोध केला जाईल, आणि तो पैसा महाराष्ट्रातल्या शेतक-यांना दिला जाईल. शिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यावर प्राधान्य देण्याचं या बैठकीत ठरले आहे.


शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची मुंबईत बैठक 



शिवसेना खासदार संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेचा धडाका दिल्लीतही सुरूच ठेवलाय. काँग्रेसनं धर्मनिरपेक्षतेबाबत काही अटी घातल्याच्या प्रश्नाला राऊतांनी उत्तर दिले आहे. देशाची राज्यघटनाच धर्मनिरपक्षे या शब्दावर आधारलेली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेबाबत आम्हाला कोणी शिवकण्याची गरज नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केले. उद्या मुंबईत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुंबईत बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितल. तसंच आज शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती राऊतांनी दिली.