मुंबई :  मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत तासभर चर्चा झाली. पंतप्रधानांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे पंतप्रधान निवासस्थानी दाखल झालेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच केंद्राकडे थकित असलेल्या GST परताव्याबाबत आणि या भेटीत कोकणातल्या वादळग्रस्तांच्या मदतीबाबतही चर्चा झाल्याचे बोलेले जात आहे.  



दरम्यान, या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री उशीरापर्यंत ही बैठक सुरु होती.


मोदी यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 7 वाजता मुंबईतून निघाले. दिल्लीत दाखल झाल्यानंतर मोदींच्या शासकीय निवासस्थानी सकाळी 11 वाजता त्यांच्यात बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील असे सांगितले गेले.  या बैठकीत काय चर्चा सुरु झाली, याबाबत मुख्यमंत्री माहिती देणार आहेत.