नवी दिल्ली: मोदी सरकारकडून लवकरच रेल्वेत मेगाभरतीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी नुकताच संसदेत सरकारी खात्यांमधील रिक्त पदांचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार विविध सरकारी विभागांमध्ये तब्बल ७ लाख जागा रिक्त आहेत. यापैकी २.६ लाख जागा या एकट्या रेल्वेत रिक्त आहेत. त्यामुळे लवकरच या जागांसाठी नोकरभरती केली जाईल, असे संकेत गंगवार यांनी दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या केंद्र सरकार रोजगाराची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी रोजगार मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नोकरभरतीला प्राधान्य देईल, असेही गंगवार यांनी सांगितले. 


मोदी सरकारने २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी रोजगारांची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सरकाराला हे आश्वासन पूर्ण करता आले नव्हते. याउलट नोटाबंदीमुळे लघू व मध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगार गमवावा लागला होता. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये देशातील बेरोजगारीच्या दराने गेल्या ४५ वर्षांतील उच्चांक गाठल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या नैमित्तिक कामगार सर्वेक्षण अहवालावरून दिसून आले होते.  विरोधकांनी या मुद्द्यावरून निवडणूक प्रचारात सरकारची चांगलीच कोंडी केली होती. त्यामुळे आता दुसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकारने रोजगारनिर्मितीला प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. 


दरम्यान, उद्या संसदेत मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन रोजगारनिर्मितीसाठी कोणत्या नव्या योजनांची घोषणा करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.