भारतात या राज्यातील अशा पुलाचं आयुष्य ५०० वर्ष, ना सिमेंट, ना लोखंडाचा वापर...पाहा
एक खास प्रकारच्या झाडाच्या मुळांपासून हे लिविंग रुट पूल बनवले जाते. या झाडांची मुळे इतके मजबूत असतात की, ते एकात-एक अडकवल्याने त्याचा पूल तयार होतो.
शिलाँग : भारतातील नॉर्थ-ईस्ट हा भाग जगातील सगळ्यात सुंदर भागापैकी एक आहे. इथे निसर्ग इतके सुंदर आहे की, ते येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे आवडीचे ठिकाण बनले आहे. नॉर्थ-ईस्टमधील मेघालयातील एका गोष्टीची संपूर्ण जगात चर्चा आहे, ते म्हणजे इकडचे 'लिव्हिंग रुट पूल'. एक खास प्रकारच्या झाडाच्या मुळांपासून हे लिविंग रुट पूल बनवले जाते. या झाडांची मुळे इतके मजबूत असतात की, ते एकात-एक अडकवल्याने त्याचा पूल तयार होतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे पूल कोणत्याही लोखंडाच्या किंवा सिमेंट काँक्रिटच्या आधारा शिवाय बनवले गेले आहेत. तसेच हे पूल हातांनी बनवले जाते.
मेघालयातील हे पूल पाहण्यासाठी पर्यटक खूप लांबून येतात. हे पूल ना कुठल्याही अभियंताने बांधल, ना कोणत्याही आर्किटेक्टने डिझाइन केलेले आहे. मेघालय हे भारतातील असे राज्य आहे, जेथे मुसळधार आणि जवळ जवळ बाराही महिने पाऊस पडतो. ज्यामुळे या भागात झाडे खूप आढळतात. त्याच बरोबर इथे नद्याही खूप असल्याने त्यांना ओलांडण्यासाठी असे पूल बांधले गेले आहेत.
मेघालयातील दोन जिल्हे, ईस्टर्न खासी हिल्स आणि वेस्टर्न जयंती हिल्समध्ये तुम्हाला असे पूल सगळीकडेच पाहायला मिळतील. हे पूल समुद्रसपाटीपासून 50 मीटर ते 1150 मीटर उंचीवर आहेत. गेल्या 180 वर्षांपासून मेघालयातील लोकं हे पूल वापरत आहेत. या भागात एकही सरकारी पूल नाही.
मेघालयाचे हे पूल झाडांच्या मुळांपासून बनविलेले आहेत. हे पूल एकाच वेळी बर्याच लोकांचे वजन वाहून नेऊ शकतात. हे पूल डबल-डेकर आणि सिंगल-डेकर रूट पूलमध्ये विभागलेले आहेत. येथील लोकं हे पूल तयार करण्यात तज्ज्ञ मानले जातात. ते 100 फूटांपेक्षा जास्त लांबीचे असतात आणि कधीकधी हे पूल पूर्ण होऊन त्याची वाढ होण्यासाठी 10 ते 15 वर्षे घेतात. हे पूल एकावेळी 50 लोकांपर्यंत वजन घेऊ शकतात.
बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अनेक शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, लिव्हिंग पूल हे नैसर्गीक इंजीनिअरींगचे सर्वात मोठे उदाहरण आहे. हे पूल नदीच्या काठावरील झाडांच्या मुळापासून बनवलेले आहेत. झाडांच्या मुळांना सुपारीच्या काड्यांशी बांधून त्याला पूलचे रूप दिले जाते. लोकांना चालण्यासाठी यामध्ये दगडांचा वापर केला जातो.
या पूलला बनायला जरी 10 ते 15 वर्षे वेळ लागत असला तरी, हे पूल तयार झाल्यानंतर 500 वर्ष टिकतात. जिथे पावसाळ्यात सामान्य पूल खराब होतात त्यांना गंज लागतो, तेथे हे लिव्हिंग रूट पूल पावसात अधिक मजबूत बनतात. त्यात यांना तयार करण्यासाठी कोणताही पैसा खर्च केला जात नाही.