मेहुल चोक्सीच्या हस्तांतरणाचा आज फैसला, डॉमिनिका कोर्टात आज सुनावणी
भारतीय बँकांची फसवणूक करून मेहूल चोकशी अँटिग्वा आणि बरमुडाहून बेपत्ता झाला होता.
मुंबई : भारतातून पळून डॉमिनिकाच्या जेलमध्ये बंद असलेल्या मेहूल चोकसीच्या (Mehul Choksi) हस्तांतरणावर आज महत्त्वाची सुनावणी आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता ही सुनावणी होणार आहे. चोकसीच्या हस्तांतरणासाठी सीबीआय अधिका-यांची टीम डॉमिनिकात दाखल झाली आहे. न्यायालयाने परवानगी दिली तर सीबीआय अधिका-यांची टीम चोकसीला घेऊन भारतात परत येतील.
भारतीय बँकांची फसवणूक करून मेहूल चोकशी अँटिग्वा आणि बरमुडाहून बेपत्ता झाला होता. डॉमिनिकामध्ये त्याने अवैध प्रवेश केल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आलं.फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी सीबीआयचं पथक डोमनिकामध्ये दाखल झालंयं अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे..
या टीमचं नेतृत्व शारदा राऊत करत आहेत. महाराष्ट्र केडरच्या आय पी एस अधिकारी असलेल्या शारदा राऊत आता सी बी आय मध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत. पीएनबी बँक घोटाळ्याचा तपासही शारदा राऊत यांनी केला आहे. त्यांच्यासह 2 सीआरपीएफ कमांडो या टीममध्ये आहेत.
डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मेहुल चोक्सीला पकडले. मेहुल चोक्सी (Mehul Choksi) हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे, त्याच्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावलीय. तो अँटिग्वामधून क्युबा येथे पळून गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची (PNB) काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. सीबीआय या दोघांविरुद्ध चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीची 14 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली होती.