वाराणसी : देशातल्या आयआयटीच्या प्लेसमेंट प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थ्याला १ कोटी ३४ लाख ६५ हजार रुपयांचं सर्वाधिक पॅकेज मिळालं आहे. जवळपास १ कोटी ३५ लाख रुपयांचं पॅकेज मिळालेल्या या विद्यार्थ्याला मायक्रोसॉफ्ट कंपनीनं अमेरिकेमध्ये नोकरीसाठी निवडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी सर्वात जास्त पगार मिळणारा हा विद्यार्थी मॅथ्स आणि कम्प्यूटरचा विद्यार्थी आहे. २०१६मध्ये ओरॅकल कंपनीनं सर्वात जास्त १.२० कोटी रुपयांचं पॅकेज दिलं होतं.


या विद्यार्थ्याला अमेरिकेच्या रेडमंड शहरातल्या मुख्यालयामध्ये नोकरी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्याला २ लाख १४ हजार ६०० अमेरिकन डॉलर (जवळपास १ कोटी ३४ लाख ६५ हजार) एवढा वार्षिक पगार देण्यात येणार आहे.


शिक्षण पूर्ण झाल्यावर हा विद्यार्थी रेडमंड शहरात जाऊन मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीला सुरुवात करेल. बीएचयूमध्ये १४ कंपन्यांनी ११४ विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या. २० डिसेंबरपर्यंत या मुलाखती सुरु राहणार आहेत.


आयआयटी दिल्लीच्या कॉम्प्यूटर सायन्सच्या विद्यार्थ्याला मायक्रोसॉफ्टनंच १.४ कोटींचं वार्षिक पॅकेज दिलं आहे. मायक्रोसॉफ्ट या वर्षी सर्वाधिक पॅकेज देऊन नोकरी देणारी कंपनी बनली आहे. मायक्रोसॉफ्टच्या भारतात नोकरी मिळणाऱ्या विद्यार्थ्याला ३४ लाख रुपयांचं पॅकेज मिळालं आहे.


मायक्रोसॉफ्टबरोबरच उबर कंपनीनंही मुंबई आणि चेन्नई कॅम्पसमधल्या एक-एक विद्यार्थ्याला नोकरी दिली आहे. उबरनं या विद्यार्थ्यांना ९९.८ कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे.


यंदाच्या वर्षी बीएचयूमध्ये मायक्रोसॉफ्ट, टॉवर रिसर्च, ओरॅकल, उबर, गोल्डमॅन, फ्लिपकार्ट, मिंड टिकल, क्वॉलकॉम, इंटल, बजाज ऑटो, मास्टरकार्ड, ईएक्सएल सर्व्हिस, एप्लाईड मटेरियल्स या कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.


आयआयटी बीएचयूमध्ये विद्यार्थ्याला सगळ्यात कमी पॅकेज १० लाख ६१ हजार रुपयांचं मिळालं आहे. पहिल्या दिवशी ११४ विद्यार्थ्यांपैकी सगळ्यात जास्त २४ विद्यार्थ्यांची निवड गोल्डमॅन कंपनीनं केली. या कंपनीनं विद्यार्थ्यांना ३१ लाख ५० हजार रुपयांचं पॅकेज दिलं. तर ईएक्सएल कंपनीनं १९ विद्यार्थ्यांना ११.२० लाख रुपयांचं पॅकेज दिलं.