पंतप्रधानांच्या ऑटोग्राफनंतर तरुणीला लग्नाच्या ऑफर
हॉस्पिटलमध्ये पाहायला येणाऱ्यांमध्ये खुद्द पंतप्रधान मोदी आलेयत यावर रीताचाही विश्वास बसत नव्हता.
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदींची १६ जुलैला मिदनापुरमध्ये रॅली होती. ते उपस्थितांना संबोधित करत असताना मध्येच मंडप पडल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले. रॅलीनंतर पंतप्रधानानी हॉस्पीटलला जाऊन जखमींची भेट घेतली. १९ वर्षांची रीता मुडी ही देखील जखमींपैकी एक होती. बांकुडा येथे राहणारी रीता आपल्या आई आणि बहिणीसोबत रॅलीमध्ये आली होती. हॉस्पिटलमध्ये पाहायला येणाऱ्यांमध्ये खुद्द पंतप्रधान मोदी आलेयत यावर रीताचाही विश्वास बसत नव्हता. आपल्याला झालेला आनंद तिने पंतप्रधानांसमोरही व्यक्त केला. यासोबतच तिने पंतप्रधानांकडे ऑटोग्राफ मागितला. आग्रह केल्यानंतर पंतप्रधानांनी ऑटोग्राफ देत, 'रीता मुडी, तु सुखी राहा' असे कागदावर लिहिले.
लग्नाची मागणी
'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेनंतर आपण सेलिब्रेटी झाल्याचे रीता सांगते. त्यादिवसापासून तिच्या घरी लोकांची रीघ लागलेली असते. सर्वांना पंतप्रधानांचा ऑटोग्राफ बघायचा असतो. दरम्यानच्या काळात तिच्यासाठी लग्नाच्या दोन मागणी आल्याचेही रीताच्या आईने सांगितले. यातील एक प्रस्ताव बांकुडा आणि दूसरा झारखंड येथून होता. ऑटोग्राफ मिळण्याआधी रीताचं लग्न जुळवणी सुरू होती पण नवऱ्याकडचे १ लाख रूपयांची मागणी करत होते. रीता ही खूप गरीब घराण्यातून आली असून बांकुडा ख्रिश्चियन कॉलेजच्या द्वितीय वर्षात शिकतेय.
कसा पडला मंडप ?
लोकांचा भार सहन न झाल्याने मंडप पडला होता. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी मंडप पडताना पाहिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी लगेच आपल्या सुरक्षा रक्षकांना लोकांची काळजी घेण्याचे आदेश दिले. पंतप्रधानांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात नेण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.