लखनऊ: देशातील लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे दिसत आहे. रोजगार बंद झाल्याने या मजुरांकडे पैसे उरलेले नाहीत. त्यामुळे आपल्या कुटुंबाला खायला काय घालायचे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच विवंचनेतून उत्तर प्रदेशच्या गुडगाव येथे एका मजुराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छब्बू मंडल असे या मजुराचे नाव असून त्याच्यामागे पत्नी, चार मुले आणि सासू-सासरे असा परिवार आहे. छब्बू गुडगावमध्ये रंगारी म्हणून काम करत होता. लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने छब्बूकडे घरच्यांसाठी दोन वेळचे जेवण आणण्याचेही पैसे उरले नव्हते. काहीच खायला न मिळाल्याने बुधवारी दिवसभर छब्बूचे संपूर्ण कुटुंब उपाशी होते. त्यामुळे गुरुवारी छब्बूने बाहेर जाऊन आपला मोबाईल विकला. मोबाईल विकून मिळालेल्या अडीच हजार रुपयांतून छब्बूने एक टेबल फॅन आणि धान्य विकत घेतले. छब्बूने धान्य आणल्यामुळे अनेक दिवसांपासून उपाशी असलेले त्याचे कुटुंब आनंदात होते. 

यानंतर छब्बुच्या पत्नीने स्वयंपाकाची तयारी सुरु केली. त्यापूर्वी ती स्वच्छतागृहात जाण्यासाठी झोपडीबाहेर पडली. छब्बुची आईही आपल्या नातवांना घेऊन जवळच्या झाडाखाली जाऊन बसली. त्यावेळी छब्बू मंडल याने घराच्या छताला दोर बांधून फाशी घेतली. छब्बुच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून छब्बू खूप तणावाखाली होता. आम्हाला रोजच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागत होता. रोजगार नसल्यामुळे आमच्याकडे पैसे उरले नव्हते. त्यामुळे आम्हाला मोफत अन्नावर किंवा इतरांच्या दयेवर अवलंबून राहावे लागत होते. एवढे करूनही रोज खायला मिळेल, याची शाश्वती नव्हती, असे छब्बुच्या पत्नीने म्हटले. 

स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, छब्बुने मानिसक तणावातून आत्महत्या केली. आम्ही त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. छब्बुच्या झोपडीपासून जवळच  मोफत अन्नाची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.मात्र, आमचे वय झाल्याने तिथपर्यंत चालत जाणे आम्हाला शक्य नसल्याचे छब्बूच्या सासऱ्यांनी सांगितले. मी अपंग आहे, माझ्या पत्नीचेही वय झाले आहे. आमची नातवंडेही खूप लहान आहेत. त्यामुळे सरकारी केंद्रावरील अन्न मिळवण्यासाठी उपाशीपोटी इतक्या लांब चालत जाणे आम्हाला शक्य नव्हते, असे छब्बुच्या सासऱ्यांनी सांगितले.