चित्तोडगढ : चित्तोडगढच्या १०० कोटींपेक्षा जास्त प्रॉपर्टी असलेल्या एका जोडप्याने सगळे ऎशोआराम सोडून सन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या जोडप्याची एकच चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिवाराचा विरोध धुडकावून या जोडप्याने हा निर्णय घेतला आहे. ३४ वर्षीय सुमीत राठोड हे नीमच येथील मोठ्या उद्योगपती परिवारातील आहे. लंडन येथून त्यानी शिक्षण घेतलं आहे. तर त्यांची पत्नी अनामिका ही इंजिनिअर आहे.   


दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, दोघांनी चार वर्षांआधी लग्न केलं होतं. त्यांना ३ वर्षांची एक मुलगीही आहे. परिवाराची जवळपास १०० कोटींची संपत्ती आहे आणि लाखो रूपयांची कमाई होत असते. अशात हा राजेशाही थाट आणि संपत्ती सोडून दोघांनी सन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. 


आम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं आहे, त्यामुळे आम्ही संत होण्याचा निर्णय घेतलाय. आमची मुलगी आठ महिन्यांची झाली, तेव्हापासूनच आम्ही ब्रम्हचर्याच पालन केलं. ही मुलगीच आमच्यासाठी वरदान आहे. ती गर्भात असल्यापासूनच आम्ही हा विचार सुरू केला होता, असे सुमीत आणि अनामिका यांनी सांगितले. दोघेही २३ सप्टेंबरला सूरतमध्ये जैन भगवती दीक्षा घेणार आहेत. 


सुमीत हे लंडनमध्ये दोन वर्ष नोकरी केल्यावर नीमचला आले. इथे त्यांची १० कोटींची फॅक्टरी असून त्यात जवळपास १०० लोक काम करतात. त्यामुळे इतकी संपत्ती आणि ऎशोआराम सोडून हे दोघेही सन्यास घेत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.