नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते मनोज सिन्हा यांनी गुरुवारी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. गाझीपूरमध्ये भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मोर्चा संमेलनात सिन्हा यांनी हे आक्षेपार्ह विधान केलंय. 'भाजपाचे कार्यकर्ते अपराध, काळं धन आणि भ्रष्टाचाराला जमीनदोस्त करण्यासाठी तयार आहेत. भाजपकडे कुणी बोट केलं तर याद राखा पुढच्या चार तासांत ते बोट सलामत राहणार नाही' असं वक्तव्य त्यांनी जाहीर सभेमध्ये केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतक्यावरच ते थांबले नाहीत तर 'भाजपा कार्यकर्त्यांकडे डोळे वटारून पाहण्याची कुवत नाही. जर कुणी डोळे वर करून पाहिलं तर जमिनीत दफन करून टाकू' असंही त्यांनी म्हटलंय. 


सैदरपूरच्या टाऊन नॅशनल इंटर कॉलेज मैदानात भाजपच्या शेतकरी मोर्चा संमेलनात ते बोलत होते. 'कोणत्याही पूर्वांचलच्या गुन्हेगाराची कुवत नाही की त्यानं गाझीपूरच्या सीमेत येऊन भाजपा कार्यकर्त्यांकडे डोळे वटारून पाहावं. जर असं झालं तर डोळे सहीसलामत राहणार नाहीत' असंही त्यांनी म्हटलं. 



यावेळी त्यांनी या मतदारसंघात १९ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूक २०१९ साठी मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.