महत्त्वाची सूचना: कोरोनाला दूर ठेवण्यासाठी ऑफिसमध्ये `इतके` तापमान ठेवा
ज्येष्ठ आणि गर्भवती महिला यासारख्या हायरिस्क गटातील कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात यावी.
नवी दिल्ली: देशभरातील कार्यालये आणि हॉटेल्स सुरु करण्याच्यादृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार कार्यालयांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २४ ते ३० अंश सेल्सिअस इतके तापमान ठेवावे. तर आर्द्रतेचे प्रमाण ४० ते ७० टक्के इतके असावे, असे या नियमावलीत म्हटले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील (containment zones) कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात माहिती द्यावी. त्यांना घरूनच काम करण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच ज्येष्ठ आणि गर्भवती महिला यासारख्या हायरिस्क गटातील कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात यावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळे पायाभूत प्रकल्पांची कामं रखडली, डेडलाईन हुकणार
तर हॉटेल्स सुरु करतानाही विशेष काळजी घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हॉटेलच्या आतमध्ये, लॉबीत आणि पार्किंग क्षेत्रात लोकांची संख्या नियंत्रित ठेवावी. तसेच स्वच्छतागृहांची व्यवस्थितपणे साफसफाई करावी. हॉटेल्समधील मुलांच्या खेळण्याचे क्षेत्र बंदच ठेवावे. हॉटेलच्या डाईन-इन क्षेत्रात ग्राहकांना जेवण देण्यापेक्षा त्यांच्या खोलीतच जेवण देण्याला प्राधान्य द्यावे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीत म्हटले आहे.
आज सकाळपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताने स्पेन आणि ब्रिटनला मागे टाकले आहे. भारतात कोरोनाचे २,९७,२०५ रुग्ण आहेत. सलग सात दिवस भारतात ९,५०० हून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. एका दिवसात मृतांची संख्याही प्रथमच ३०० च्या वर गेली आहे.