खासदारांकडून महिला मार्शल सोबत गैरवर्तन, राज्यसभेतील गदारोळावरील अहवालात धक्कादायक दावा
अहवालात खासदारांवर धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : राज्यसभेत झालेल्या गदारोळावर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल यांनी कालच सांगितले होते की, चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली पाहिजे. आता या प्रकरणी तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार, दुरुस्ती विधेयक सादर होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी सभागृहाचे कामकाज नेहमीप्रमाणे चालू होते. गोंधळाबाबत तयार केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, गोंधळ निर्माण करणाऱ्या सदस्यांनी टेबलवर चढून कागद फाडण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा गोंधळ वाढला, तेव्हा त्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा अधिकार्यांनी आणखी काही नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खासदारांनी कागद फाडले आणि ते अध्यक्षांकडे फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर अतिरिक्त सुरक्षा मागवण्यात आली होती. सुरक्षा कवच तोडण्यात अपयश आल्यानंतर विरोधी खासदारांनी मार्शलशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. एका महिला मार्शलला एका खासदाराने वाईट रीतीने ओढले होते, त्यानंतर महिला मार्शलला अनेक जखमा झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.
एका खासदाराने सुरक्षा कवच तोडण्याच्या प्रयत्नात मार्शलची मानही पकडली, ज्यामुळे मार्शलला गुदमरल्या सारखे झाले. या काळात कोणत्याही मार्शलने कोणत्याही खासदारासोबत गैरवर्तन केले नाही. डोला सेन आणि शांता छेत्री संध्याकाळी 6.04 वाजता वेलमध्ये पोहोचल्या. फुलो देवी नीतम यांनी संध्याकाळी 6.08 वाजता कागद फाडले आणि एसजीच्या दिशेने खुर्चीवर फेकले. छाया वर्मा यांनीही रात्री 8 वाजून 9 मिनिटांनी पेपर फाडला.
नायडू, बिर्ला यांनी चिंता व्यक्त केली
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी संसदेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात काही खासदारांच्या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली. अशा गोष्टी सहन केले जाऊ नयेत असे सांगितले. पावसाळी अधिवेशन स्थगित केल्याच्या एक दिवसानंतर, बिर्ला यांनी नायडू यांची भेट घेतली आणि दोघांनी सत्रादरम्यान "संसदेतील दुर्दैवी घडामोडींचा" आढावा घेतला.
'असे वर्तन सहन केले जाऊ नये'
उपराष्ट्रपती सचिवालयाने ट्विट केले आहे की, दोघांनी काही खासदारांच्या अडथळा आणणाऱ्या वर्तनावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यात म्हटले आहे की, "त्यांचे असे ठाम मत आहे की असे बेताल वर्तन सहन केले जाऊ नये आणि योग्य कारवाई केली जावी."
संसदीय कामकाज मंत्र्यांनी नायडू यांची भेट घेतली
तत्पूर्वी, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल आणि मुख्तार अब्बास नकवी यांनी नायडू यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. काही सदस्यांच्या वाईट वर्तनाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.