नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO)महत्वाकांक्षी 'गगनयान मोहीम' अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. या मोहिमेतंर्गत डिसेंबर २०२१ पर्यंत भारताकडून अवकाशात अंतराळवीर पाठवण्यात येणार आहे. भारताकडून पहिल्यांदाच अवकाशात अंतराळवीर पाठवण्यात येणार असल्याने या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. मात्र, सध्या ही 'गगनयान मोहीम' एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवकाशात जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांना खास खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. म्हैसूर येथील संरक्षण खाद्य संशोधन प्रयोगशाळेत (Defence Food Research Laboratory) हे खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत. यामध्ये इडली, EGG रोल, व्हेज रोल, मुगाचा हलवा आणि व्हेज पुलाव अशा पदार्थांचा समावेश आहे. तसेच पाणी आणि फळांचे रस ठेवण्यासाठी विशेष कंटनेर्सही तयार केले जात आहेत. त्यामुळे आता भारतीय अंतराळवीरांना अवकाशातही या खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटता येणार आहे. 



भारताने डिसेंबर २०२१ पर्यंत अवकाशात मानवसहित यान पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी 'इस्रो'कडून गगनयानाची निर्मिती करण्यात आली आहे. या अंतराळ यानातून तीनजण प्रवास करु शकतात. हे यान सात दिवस अवकाशात राहू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून  गगनयान मोहीमेची घोषणा केली होती. 'गगनयान' मोहीमेसाठी साधारण १० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मोहीमेसाठी चार अंतराळवीरांची निवड झाली होती. सध्या रशियामध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे.