बंगळुरू: कर्नाटकमधील एका जाहीर कार्यक्रमात महिलेशी गैरवर्तन केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या वादात सापडले होते. मात्र, आता या प्रकरणातील दुसरी बाजू समोर आली असून संबंधित महिलेने स्वत:ची चूक असल्याचे सांगितले आहे. जमाला असे या महिलेचे नाव आहे. तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सिद्धरामय्या यांच्याविरोधात माझी कोणतीही तक्रार नाही. ते एक चांगलेच मुख्यमंत्री होते. तक्रार करण्याच्या नादात मी जरा जास्तच बोलून गेले. एका माजी मुख्यमंत्र्याशी असे वागणे उचित नव्हते. मी त्यांच्यासमोरील टेबलावर जोरात हात आपटल्याने सिद्धरामय्या यांना राग आला, असे जमालाने सांगितले. तर दुसरीकडे सिद्धरामय्या यांनीही जमाला आपल्याला बहिणीसारखी असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ती बराचवेळ बोलत होती. तिला थांबवण्यासाठी मी गेलो तेव्हा हा प्रकार घडला. हा प्रकार केवळ एक दुर्घटना होती. जमाला हिला मी गेल्या १५ वर्षांपासून ओळखतो व ती मला बहिणीसारखी आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले. 



तत्पूर्वी या घटनेच्या व्हीडिओमुळे सोशल मीडियावर सिद्धरामय्या यांच्याविरोधात टीकेची प्रचंड राळ उठली होती. जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी काँग्रेसतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक नागरिक उपस्थित होते. त्यावेळी जमालाने थेट सिद्धरामय्या यांचे चिरंजीव आणि मतदारसंघाचे आमदार डॉ. यतींद्र यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. तेव्हा सिद्धरामय्या यांनी तिच्या हातामधील माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या नादात जमालाची ओढणी खेचली गेली. यामुळे वाद निर्माण झाला होता. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश राव यांनी तात्काळ यावर स्पष्टीकरण दिले होते. सिद्धरामय्या यांचा महिलेशी गैरवर्तन करण्याचा कोणताही हेतू नव्हता. महिलेच्या हातामधील माईक काढून घेताना चुकून तिची ओढणी हातात आली, असे राव यांनी सांगितले.