`संपूर्ण दारुबंदी करा नाहीतर दारुड्यांना Insurance द्या!` आमदाराची राज्य सरकारकडे मागणी; म्हणाले, `पैसा...`
Liquor Ban Or Insurance For Drunkards: मध्यंतरी विषारी दारु प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ या आमदाराने आपली बाजू मांडताना दिला आहे. तसेच आता आपण थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही या आमदाराने म्हटलं आहे.
Liquor Ban Or Insurance For Drunkards: देशातील काही राज्यांमध्ये मद्यविक्री आणि मद्यपानावर बंदी आहे. यामध्ये प्रामुख्याने गुजरात आणि बिहारसारख्या राज्यांचा समावेश आहे. मद्यपान बंदी हा कायमच चर्चेचा विषय असतानाच बिजू जनता दलचे आमदार सनातन महाकुद यांनी शनिवारी याच विषयावर बोलताना एक विचित्र मागणी केली आहे. राज्यामध्ये पूर्णपणे दारुबंदी करा किंवा मद्यपींना विमा लागू करा, अशी मागणी सनातन यांनी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडे केली आहे.
थेट मंत्र्यांना पत्र; उत्तरही आलं
67 वर्षीय सनातन हे ओडिशामधील चंपूआ मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजं सापडतात. त्यामुळेच या भागातील अनेक नेते सधन घरातील असून स्वत: सनातन यांची एकूण संपत्ती 277 कोटी रुपये इतकी आहे. त्यांनी अबकारी कर मंत्र्यांना लेखी पत्र लिहून मद्यासंदर्भात काय ते निश्चित धोरण ठरवावं असं म्हटलं आहे. "राज्यामध्ये दारुवर पूर्णपणे बंदी घालण्याचा सरकारचा काही विचार आहे का? सरकारचा असा काही विचार नसेल तर मद्यपींची नोंदणी करुन त्यांना आरोग्य विम्याचं कवच देणार आहे का?" असा सवाल या पत्रामधून सनातन यांनी केला आहे. सनातन यांच्या पत्राला अबकारी कर मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी सरकारचा सध्या तरी मद्यावर बंदी घालण्याचा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे.
मी दारुबंदीचा समर्थक
या उत्तरानंतर सनातन यांनी पत्रकारांशी बोलताना आमदार म्हणून आपल्याकडे असलेले अधिकार वापरुन आपण मुख्यमंत्र्याबरोबरच अबकारी कर मंत्री किंवा मुख्य सचिवांना मद्यावर पूर्णपणे बंदी घालवी किंवा मद्यपींना विमा संरक्षण द्यावं अशी मागणी करणार आहोत, असं म्हटलं आहे. "मी यापूर्वीही मद्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यामधून कर स्वरुपात पैसे मिळत असल्याने मद्यावर बंदी घालता येणार नाही असं सरकारने म्हटलं आहे. अनेकांचं आयुष्य दारुमुळे उद्धवस्त झालं आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. मी पूर्णपणे बंदी घालण्याचा मोठा पाठिराखा आहे," असं सनातन यांनी म्हटलं आहे. यापूर्वी सनातन हे 2014 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते.
सरकारला उत्पनाची काळजी असेल तर..
सरकारला तर मद्य विक्रीमधून मिळणाऱ्या कर रुपातील पैशाची काळजी असेल तर त्यांनी मद्यपींना विमा कवच दिलं पाहिजे. मद्यपान करणाऱ्यांना सरकारने विमा दिला पाहिजे असं 11 वी पर्यंत शिकलेल्या या आमदाराचं म्हणणं आहे. "मद्यावर पूर्णपणे बंदी घातली तर देश आणि राज्य पुढे जाईल," असं सनातन यांचं म्हणणं आहे.
त्या कुटुंबांनी कसं जगायचं?
"सरकार दारु विक्रीला परवानगी देण्यामागील कारण त्या माध्यमातून मिळणारा पैसा आहे. अगदी साध्या दुकानांमध्येही दारु मिळते," असं सांगत सनातन यांनी नुकत्याच विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख केला. गंजम जिल्ह्यामधील तीन जणांचा विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याचा उल्लेख करत सनातन यांनी मृतांचे कुटुंबीय आता पुढील आयुष्य कसं काढणार? असा प्रश्न उपस्थित करताना, "म्हणून मी मद्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे," असं म्हटलं.