मुंबई : भोंग्यावरून राज्यातलं राजकारण तापलं आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे देखील अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून शिवसेना-मनसेतली (Shivsena-MNS) चुरस आणखी रंगण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मशिदींवरील भोग्यांवरून सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर आता राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसे सक्रिय दिसत नाहीत. आदित्य ठाकरेंनी सूत्र हाती घेतली असली तरी त्यांचा भर विकासाच्या राजकारणावरच राहिला आहे. त्यामुळे हिंदुत्वावादी चेहरा अशी त्यांची ओळख नाही. 


स्वाभाविकच हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र दिसतंय आणि नेमकी हीच पोकळी भरून काढण्याची संधी राज ठाकरे यांनी साधली आहे. ब्लू प्रिंटवर बोलणा-या राज ठाकरेंनी आता भगवी प्रिंट स्वीकारत प्रखर हिंदुत्वाकडं वाटचाल सुरू केलीय. अयोध्येला जाण्याची घोषणा करून त्यांनी शिवसेनेवर आणखी एक कडी करण्याचा प्रयत्न केलाय. 


अयोध्येला जाण्यात गैर काय, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय. विषेश म्हणजे या अयोध्यावारीत शिवसेनाही मागे नाही. युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही पुढच्या महिन्यात अयोध्येत जाणार आहेत. दौ-याच्या तारखेबाबत त्यांनी संजय राऊतांसोबत चर्चाही केलीय. 


राज्यात शिवसेना आणि मनसेत विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. त्यात सत्तेत आल्यापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावरून काहीशी मवाळ झालीय. हाच हिंदुत्वाचा धागा पकडून राज्याच्या राजकारणात जोरदार कमबॅक करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंचा असेल. मात्र शिवसेना मनसेला ही संधी सहजासहजी देणार नाही. आता अयोध्येचा राम नेमका कुणाला तारणार, हे पाहायचं...