Raj Thackeray on Manipur Issue: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.  अशांत मणिपूरमधील हिंसाचारामुळे दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दशः असंतोषाने धुमसतंय. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या घरावरच लोकांनी संतापाने हल्ला चढवला इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळं गेले २ महिने सुरु आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्रसरकारला अपयश का येतंय हे कळत नाही, असे ठाकरे पत्रातून म्हणाले.



ईशान्य भारताकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केलं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी दूषणं द्यायचे पण आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे चार दिवस मणिपूरमध्ये जाऊन राहिले होते तरीही परिस्थिती आटोक्यात का आली नाही? ह्या विषयावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. किमान त्यानंतर तरी पंतप्रधानांकडून ठोस कृती होईल असं वाटलं होतं, असे ते पत्रातून म्हणाले.


मणिपूरचं सध्याचं नेतृत्व जर परिस्थिती हाताळायला निष्प्रभ ठरत असेल तर योग्य निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने घ्यावा. ईशान्येकडील राज्यांना प्रवाहात आणण्यासाठी अटलजींनी खूप प्रयत्न केले होते. पण सध्या मणिपूरकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे ते पाहून, हे सगळे प्रयत्न वाया जातील अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावर ठोस पावलं उचला, मणिपूर पूर्ववत होईल हे पाहा, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना केले आहे.