किराणा दुकानातील बिस्किटं-कुरकुरे चोरल्याने 4 चिमुकल्यांना बेदम मारहाण करुन झाडाला बंधून ठेवलं
Bihar Minor Boy Incident : माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. बिहारमध्ये 4 लहान मुलांना मारहाण करुन झाडाला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील गर्दीचा अमानवीय चेहरा जगासमोर आला आहे. येथे किराणा मालाच्या दुकानातील बिस्किट आणि कुरकुरे चोरल्यामुळे 4 लहान चिमुकल्यांना जमावाने अमानुष मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे फक्त मारहाणच केली नाही तर त्यांना झाडाला तासन् तास बांधून ठेवलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या घटनेच्या व्हिडीओत संपूर्ण क्रूर कृत्य कैद झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावातील लोकांनी फक्त बघ्याची भूमिका साकारली. कुणीच त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
28 ऑक्टोबरमध्ये ही घटना वीरपुर ठाणे परिसरातील फाजिलपुर या गावात घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चार चिमुकल्या मुलांना बेदम मारहाण करून त्यांना झाडांना बांधून ठेवण्यात आले. या व्हिडीओनेतर एसपी योगेंद्र कुमार यांनी दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे.
बेदम मारहाणीनंतर झाडाला बांधून ठेवलं
या घटनेबाबत सांगितले जात आहे की, शनिवारी सकाळी चार स्थानिक मुलांवर किराणा दुकानात घुसून बिस्किटे, कुरकुरे यांसारखे खाद्यपदार्थ चोरल्याचा आरोप आहे. यावेळी चौघांना कोणीतरी चोरी करताना पकडले. या सर्वांना काही लोकांनी बेदम मारहाण केली आणि चारही अल्पवयीन मुलांना दोरीने खांबाला बांधले.
दुकानदारावर कडक कारवाई - एसपी
एसपी योगेंद्र कुमार म्हणाले की, हे प्रकरण वीरपूर पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. काही मुले दुकानात सातत्याने चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दुकानदाराने या मुलांना रंगेहात पकडले. यानंतर दुकानदाराने मुलांना बांधून मारहाण केल्याचे समोर आले, जे अत्यंत चुकीचे आहे.
मुलांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी लेखी अर्ज मागविण्यात आला आहे. मात्र मुलांच्या कुटुंबीयांनी अर्ज केलेला नाही. ज्या दुकानदाराने चुकीचा व गंभीर गुन्हा केला असेल तर त्याच्या कुटुंबीयांशी पुन्हा संपर्क साधून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश आम्ही वीरपूर पोलीस ठाण्याला दिले आहेत.
ते म्हणाले की, लहान मुलांच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीने संवेदनशील असायला हवे. लहान मुलांसोबत अशी कृती करणे हा गंभीर गुन्हा असून त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.