धक्कादायक ! मोबाईलच्या वादातून 8 वर्षाच्या मुलाने आपल्या 12 वर्षाच्या मोठ्या भावावर चाकूने...
मोबाईलचा नाद किती धोकादायक ठरु शकतो याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mobile Addiction : मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन वाढत चालले आहे. आताच हेच व्यसन जीवघेणे बनले आहे. मोबाईलसाठी दोन मुलांमध्ये वाद होत आहेत. इतकंच नाही तर पालक देखील मोबाईलवरुन मुलांवर चिडत आहेत. पण मोबाईलमुळे होणारे वाद किती धक्कादायक ठरू शकतात याचे उदाहरण झारखंडमधून समोर आले आहे. मोबाईलवरून झालेल्या वादातून एका 8 वर्षाच्या मुलाने आपल्या 12 वर्षाच्या मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मोबाईलसाठी भांडण
ही घटना झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील आहे. मोबाईल वापरण्यावरून दोन मुलांमध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात आले. ज्यामध्ये एका 8 वर्षांच्या मुलाने आपल्या 12 वर्षांच्या मोठ्या भावावर चाकूने वार केले. मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. मोबाईलमुळे मुलांच्या वागण्यात बदल झाल्यामुळे आसपासचे लोकही चिंतेत आहेत.
भावाच्या पोटात वार
कोडरमा जिल्ह्यातील डोमचांच पोलीस ठाण्याच्या गैठीबाद गावातील राणा टोला येथील रहिवासी पप्पू राणा यांच्या दोन्ही मुलांमध्ये गुरुवारी रात्री मोबाईलवरून भांडण सुरू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, लहान भाऊ तरुण याने स्वयंपाकघरातून चाकू आणून अचानक मोठ्या भावाच्या पोटात वार केला. कुटुंबीयांनी घाईघाईने करणला खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला.
मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमॉर्टम
घटनेनंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच एसडीपीओ अशोक कुमार तपासासाठी पोहोचले आणि त्यांनी कुटुंबीयांची चौकशी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. येथे पीडित कुटुंबाची अवस्था बिकट आहे. अवघ्या आठव्या वर्षी लहान मुलाने मोठ्या भावाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.