नवी दिल्ली : केंद्रामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधील भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण झालीत. २०१९च्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी भाजपनं साफ नियत, सही विकास-२०१९ में फिर से मोदी सरकार असा नारा दिलाय. या घोषवाक्यासह भाजप देशभर आनंदोत्सव साजरा करणार आहे. सरकारच्या योजना आणि कामे जनतेपर्यंत पोचवली जाणार आहेत. ओडीशातील कटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका जाहीर सभेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या कामांची माहिती देणार आहेत.  ११ जूनपर्यंत देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 


जनतेचा विश्वासघात  


 दुसरीकडे मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करुन काँग्रेस विश्वासघात दिवस पाळणार आहे. इंधन दरवाढ, बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी कसं मुकावं लागलं, महागाई, सरकारने उद्योगपतींना कसा फायदा करुन दिला अशा विविध गोष्टी जनतेपर्यंत पोहचवण्याचं काँग्रेसने ठरवलं आहे. काँग्रेसने या संदर्भात एक पोस्टर प्रकाशित केलंय. त्यावर विश्वासघात असं लिहलंय.