नवी दिल्ली - परदेशात प्रवास करायचा असेल, तर पासपोर्ट हा खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे. पासपोर्टवरच कोणत्याही देशाचा व्हिसा जारी केला जात असतो आणि परदेशात कुठेही फिरत असताना तीच तुमची ओळख असते. बनावट पासपोर्टच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नव्या स्वरुपातील पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात करणार आहे. ज्यांच्याकडे जुने स्वरुपातील पासपोर्ट आहेत. त्यांनाही ते बदलून नव्या रुपातील पासपोर्ट घ्यावे लागणार आहेत. विशेष म्हणजे या पासपोर्टमध्ये आधुनिक सुरक्षेसाठी एक चिप बसविण्यात आली आहे. या चिपमध्येच पासपोर्टधारकाची सर्व माहिती असेल. या पासपोर्टच्या पेपरचा दर्जा आणि छपाईसुद्धा उच्च दर्जाची असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या स्वरुपातील पासपोर्टची छपाई नाशिकमधील सिक्युरिटी प्रेसमध्ये करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने सिक्युरिटी प्रेसला चिपच्या पासपोर्टची कार्यप्रणाली घेण्यासाठी टेंडर काढण्यास मंजुरी दिली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लगेचच पासपोर्ट तयार करण्याचे काम सुरू होईल. परराष्ट्र मंत्री व्ही. के. सिंह यांनी सरकारने ई-पासपोर्टच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवला असल्याचे सांगितले. 


ई-पासपोर्टमधील चिपमध्ये संबंधित नागरिकाबद्दलची संपूर्ण माहिती असेल. संबंधित नागरिकाचा बायोमेट्रिक डेटा आणि डिजिटल स्वाक्षरी पासपोर्टच्या चिपमध्ये साठवून ठेवलेली असेल. विमानतळावरील यंत्रणेवर पासपोर्टधारकाची संपूर्ण माहिती दिसणार आहे. कोणी जर का या चिपमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला, तर विमानतळावरील यंत्रणेला लगेचच त्याची माहिती मिळेल. त्यामुळे पासपोर्ट वैध ठरणार नाही. परदेशातील भारताच्या सर्व दूतावासांना ई-पासपोर्ट प्रणालीशी जोडण्यात येणार आहे. अमेरिका आणि ब्रिटनमधील भारतीय दूतावासांना या प्रकल्पाशी अगोदरच जोडण्यात आले आहे. 


फक्त सात दिवसांत निर्मिती
आतापर्यंत सामान्य पद्धतीने पासपोर्ट तयार करण्यास जास्त दिवस लागत होते. चिप असलेले पासपोर्ट तयार करण्यासाठी इतका वेळ लागणार नाही. अर्ज केल्यानंतर ७ दिवसांतच हे पासपोर्ट तयार होणार आहेत. नवीन पासपोर्ट जारी केल्यावर संबंधित नागरिकाकडे असलेला जुना पासपोर्ट आपोआप रद्द होणार आहे.