पीओकेवर लष्करी कारवाई झाल्यास कोणाकडे किती ताकद?
पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याची धमक आणि ताकद लष्करात असल्याचं लष्करप्रमुखांनी म्हटलं आहे.
मुंबई : देशाचे नवे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. नियंत्रण रेषेच्या पलिकडे असलेला बराचसा भूभाग हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचा ठराव संसदेत यापूर्वीच मंजूर झाला आहे. याचाच आधार घेऊन संसदेनं आदेश दिले तर पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याची धमक आणि ताकद आपल्या लष्करात असल्याचं लष्करप्रमुखांनी म्हटलं आहे.
लष्करप्रमुखांच्या या विधानामागे महत्त्वाचं कारण आहे. पाकिस्तान सरकारनं या भागावर आपला जम अधिक मजबूत करण्यासाठी कारस्थानं करायला सुरूवात केली आहे. आतापर्यंत गिलगिट, बाल्टिस्तानचा हा भाग पाकिस्तानच्या दृष्टीकोनातून 'आझाद काश्मीर' होता. मात्र आता या भागाचं नाव 'जम्मू अँड काश्मीर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस' असं करण्यात आलं आहे. हा भाग गिळंकृत करण्याचा खान यांचा हा कट असल्याचा आरोप पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते नासीर अझीझ खान यांनी केला आहे.
एकीकडे पाकव्याप्त काश्मीर संपूर्णतः गिळंकृत करण्याचा डाव पाकिस्ताननं आखला असताना आता भारतानं सिद्धता केल्याचं लष्करप्रमुखांच्या विधानामुळे स्पष्ट झालं आहे. भारतानं लष्करी कारवाई सुरू केलीच तर त्याला विरोध करण्याची पाकिस्तानची ताकद फारच कमी आहे.
भारतात लष्करी जवानांची संख्या १ कोटी २४ लाख आहे. तर पाकिस्तानची संख्या केवळ ५ लाख ६० हजार आहे. भारताकडे ३ हजार ५६५ रणगाडे आहेत आणि पाकिस्तानकडे २ हजार ४९६. २७५ हेलिकॉप्टर्ससह भारतीय लष्कर सज्ज आहे, पाकिस्तानकडे ११५ हेलिकॉप्टर्स आहेत. आर्टिलरीमध्येही पाकिस्तानची ताकद भारताच्या निम्म्यावरच आहे.
भारताचे नौसैनिक ६७ हजार ७०० आहेत. तर पाकिस्तानकडे २३ हजार ८०० आहेत. भारताकडे एक विमानवाहू युद्धनौका आहे. पाकिस्तानकडे एकही नाही. भारताकडे १६ पाणबुड्या आहेत, पाकिस्तानकडे त्याच्या निम्म्या. भारताकडे १४ विनाशिका आहेत. पाकिस्तानकडे शून्य, भारताकडे १३ फ्रिगेट्स आहेत, पाकिस्तानकडे ९. भारताकडे १०६ गस्ती आणि किनारी युद्धनौका आहेत तर पाकिस्तानकडे आहेत केवळ १७.
वायूदलाची भारताची ताकद आहे १ लाख २७ हजार २०० सैनिकांची, तर पाकिस्तानच्या वायुदलात ७० हजार सैनिक आहेत. भारताकडे ८१४ लढावू विमानं आहेत, तर पाकिस्तानकडे ४२५. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात ३९० हेलिकॉप्टर्स आहेत. पाकिस्तानकडे आहेत फक्त १९. फक्त एकाच बाबतीत पाकिस्तानचा आकडा भारतापेक्षा जास्त आहे. तो म्हणजे अण्वस्त्र. भारताकडे १४० अण्वस्त्र आहेत तर पाकिस्तानकडे दीडशे. मात्र दोन्ही देशांच्या आकारमानाचा विचार करता या बाबतीतही भारतच भक्कम स्थितीत आहे, असं म्हणता येईल.
जनरल नरवणे म्हणाले त्याप्रमाणे आपल्या लष्कराची ताकद आहेच... गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची... काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुच्छेद ३७० हटवण्याचं दमदार पाऊल टाकणाऱ्या केंद्र सरकारला नजिकच्या काळात पाकव्याप्त काश्मीरवरही निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे.