नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात (INX Media Case) तब्बल १०६ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर काल (बुधवारी) सायंकाळी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम जामिनावर तुरुंगातून बाहेर आले. यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत 'सरकार माझा आवाज दाबू शकत नाही' असं म्हणत मोदी सरकारवर टीका केलीय. कोणत्याही आरोपांशिवाय नेत्यांना अटक करण्यात आली, असंही त्यांनी म्हटलंय. स्वातंत्र्याची काहीही किंमत असू शकत नाही. आपल्याला आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर आपल्यालाच त्यासाठी लढावं लागेल, असंही त्यांनी म्हटलंय. आयएनएक्स मीडिया प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्यानं त्यावर कोणतीही टिप्पणी करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. यावेळी, त्यांनी घसरलेल्या अर्थव्यवस्थेचा मुद्दा जोरदार उचलून धरला. आरबीआयच्या आज जाहीर झालेल्या आर्थिक धोरणानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'देशात मंदीसारखी परिस्थिती निर्माण झालीय. अर्थव्यवस्था ८ टक्क्यांवरून घसरून ४.५ टक्क्यांवर येऊन पोहचलीय... परंतु, सरकार मात्र हे मान्य करायला तयार नाही. सद्य वर्षाच्या शेवटपर्यंत आर्थिक वृद्धी ५ टक्क्यांवर जरी आली तरी आपण भाग्यशाली ठरू', असा टोमणाही त्यांनी यावेळी मोदी सरकारला मारला. 


माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी आधीच दिलेल्या चेतावणीप्रमाणे, ज्या पद्धतीनं हे सरकार आकडे जनतेसमोर सादर करत आहे त्याप्रमाणे ही वृद्धी ५ टक्के नाही तर १.५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. 



पंतप्रधानांनी हा मुद्दा त्यांच्या मंत्र्यांवर सोडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी घसरत्या अर्थव्यवस्थेवर गप्प का? असा सवाल करतानाच हे सरकार अर्थव्यवस्थेचं 'असमर्थ व्यवस्थापक' असल्याची जळजळीत टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. देशाची अर्थव्यवस्था चुकीच्या हातांत आहे. कर दहशतवाद, जीएसटी आणि नोटबंदी सारख्या निर्णयांनी देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याचंही त्यांनी म्हटलं.