नवी दिल्ली: देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतचे संकेत दिले. तुर्तास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षाच्या आयकर परताव्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, चालू आर्थिक वर्षात आयकर परतावा भरण्यास उशीर झाल्यास दंडाची रक्कम १२ टक्क्यांवरून ९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तसेच आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याची मुदतही ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. 


दरम्यान, आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते काही महत्त्वपूर्ण घोषणा करु शकतात. कोरोनामुळे देशातील आर्थिक स्थिरतेला धोका निर्माण झाल्यास देशभरात कलम ३६० अंतर्गत आणीबाणी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील घोषणा पंतप्रधान मोदींकडून होण्याची शक्यता अनेकजण वर्तवित आहेत.



 


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे. आगामी काळात अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज आणण्याची तयारी सुरु आहे.