नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे लगेचचं सुरू होणार आहेत. मोदींच्या दुसऱ्या सत्राचा पहिला परदेश दौरा मालदीव येथे असेल. ७ किंवा ८ जून रोजी मोदी मालदीवला भेट देणार असल्याचं वृत्त मालदीवमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी देखील दिलं आहे. २३ मे रोजी मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी मोदींना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. २०१४ साली पंतप्रधान झाल्यावर मोदींनी पहिल्यांदा भुटानचा दौरा केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोव्हेंबर २०१८ मध्ये इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावली होती. मार्च महिन्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यादेखील मालदीवच्या दौऱ्यावर केल्या होत्या. यावेळी त्यांनी मालदीवला भारताकडून १०० मिलियन मालदीव रुपयांची मदत केली होती.


मालदीवमध्ये भारत सरकार दोन प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा मागच्याच आठवड्यात करण्यात आली होती. यामध्ये एक पोलीस अॅकेडमी आणि एक कनव्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. यातली पोलीस अॅकेडमी धालू अटोलमध्ये आणि कनव्हेन्शन सेंटर उकूलहासमध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी भारताने १४.८ मिलियन मालदीव रुपयांची मदत केली आहे.


नरेंद्र मोदींच्या वेळापत्रकात पुढच्या ७ महिन्यांमध्ये ७ परदेश दौरे आहेत. यामध्ये मालदीव, कायरगिस्तान, जपान, फ्रान्स, रशिया, थायलंड आणि ब्राझील यांचा समावेश आहे.


नरेंद्र मोदी कायरगिस्तानला एससीओ समिटसाठी, जपानला जी-२० समिटसाठी, फ्रान्सला जी-७ समिटसाठी, रशियाला इस्टर्न इकोनॉमिक फोरमसाठी, थायलंडला इस्ट एशिया समिटसाठी आणि ब्राझीलला ब्रिक्स समिटसाठी जातील.