डेहराडून - प्रभू श्रीराम आणि गोमाता हे दोन्हीही हिंदू संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. आम्हाला प्रभू श्री राम यांच्याबद्दल श्रद्धा आहे. त्यामुळेच अयोध्येत मूळ जागीच श्रीरामाचे मंदिर झाले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. जर अयोध्येत मूळ जागी प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण केले गेले, तर संपूर्ण विश्वात हिंदुत्वाची ओळख प्रस्थापित होईल. त्यासाठीच असे करणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. केंद्रात कुणाचंही सरकार असो लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राम मंदिर उभारणीस सुरुवात करेल, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. ते डेहराडून इथं आयोजित संघाच्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते. कुंभ मेळ्यात झालेल्या धर्म संसदेनुसारच मंदिराची उभारणी केली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच विश्व हिंदू परिषदेनं लोकसभा निवडणुकीपर्यंत राम मंदिर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली होती. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी राम मंदिर, धार्मिक भेदभाव आणि जातीय आरक्षणासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहन भागवत हे चार दिवसांच्या डेहराडून दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. देशातील मदरशांमध्ये भारतीयत्वाचा पाठ शिकवला गेला पाहिजे. भारतीयत्वामध्ये दोन धर्मांमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही आणि देशात शांती प्रस्थापित झाली पाहिजे, यावर जोर दिला जातो. हाच पाठ मदरशांमध्ये शिकवला गेला पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले. 


स्वतःची उपासन पद्धती कोणती असावी, याची निवड करण्यासाठी मुस्लिम समाज स्वतंत्र आहे. तरी पण त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण एकाच संस्कृतीत आणि देशात राहतो. आपले पूर्वजही याच संस्कृतीत वाढले होते. त्यामुळे सामूहिक विचार करण्याच्या माध्यमातूनच सशक्त समाज आणि देश निर्माण केला जाऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केवळ भारतातीलच नव्हे तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील पूर्वजही एकच होते. ते सगळे एकाच संस्कृतीतून पुढे आले आहेत. याचे त्यांनी एक उदाहरणही यावेळी दिले. ते म्हणाले, इस्लाम धर्मामध्ये संगीत वर्जित समजले जाते. तरीही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात कव्वाली म्हटली जाते. आपण सर्व जण एकाच संस्कृतीतून आलो आहोत. गौतम बुद्ध, गुरु नानक आणि महावीर वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत असले, तरी ते सर्व हिंदू समाजाचेच अंग आहेत, असे मोहन भागवत म्हणाले.


डेहराडून मुक्कामात मोहन भागवत वेगवेगळ्या वर्गातील प्रतिनिधींना भेटणार आहेत. त्याचबरोबर संघ कार्यकर्ते आणि प्रतिनिधींनाही ते मार्गदर्शन करणार आहेत.