Monkeypox Virus: मंकीपॉक्सनं वाढवली चिंता; भारतातही नवे नियम लागू, कोरोनाचेच दिवस परततायत?
Monkeypox Virus: देशभरात पुन्हा एकदा कोरोनासम परिस्थिती उदभवली असून, या परिस्थितीमागचं कारण ठरत आहे तो म्हणजे मंकीपॉक्स संसर्ग.
Monkeypox Virus: कोरोनातून देश सावरल्यानंतर आता आणखी एका संसर्गानं डोकं वर काढल्यामुळं जगभरातील आरोग्य यंत्रणा चिंतातूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनासारखीच परिस्थिती पुन्हा उदभवू नये यासाठी काही महत्त्वाच्या निकषांच्या आधारे काळजीसुद्धा घेतली जात आहे. याच धर्तीवर भारतात नवे नियम लागू करण्यात आले असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं संसर्गाचा धोका लक्षात घेता हे निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
आरोग्य विभागाचीही भीती आणि चिंता वाढवणाऱ्या या संसर्गाचं नाव आहे मंकीपॉक्स. या विषाणूजन्य आजाराच्या धर्तीवर भारतातही आरोग्य मंत्रालयानं काही निर्देश जारी केले आहेत. शेजारी राष्ट्रात अर्थात पाकिस्तानमध्ये मंकिपॉक्सचा रुग्ण आढळल्यानंतर आता आरोग्य मंत्रालयानं देशातील सर्व विमानतळांसह बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमेनजीक असणाऱ्या बेटांवरील अधिकाऱ्यांना मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या धर्तीवर सतर्क राहण्याच्या सूचना बजावल्या आहेत.
केंद्राच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार इथून पुढं देशातील विमानतळांवर मंकीपॉक्सच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्यांची तपासणी करण्यात येईल. यादरम्यान संशयित रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाच्या विलगीकरणासाठीची पूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. मंकीपॉक्सच्या बाधित रुग्णामुळं देशात ही साथ पसरण्यास वेळ लागणार नाही, ज्यामुळं आता आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं तातडीनं काही पावलं उचलली जात आहेत.
हेसुद्धा वाचा : मायग्रेनने हैराण झालात, घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं मंकीपॉक्सग्रस्त रुग्णाच्या विलगीकरण आणि निरीक्षणासह उपचारांसाठी दिल्लीमधील (राम मनोहर लोहिया, सफदरजंग आणि लेडी हॉर्डिंग रुग्णालयांमध्ये नोडल केंद्र उभारण्यात आली आहेत. याशिवाय सर्व राज्यांनाही अशा रुग्णालयांची नावं सुचवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
काय आहेत मंकीपॉक्सची लक्षणं?
मंकीपॉक्सच्या संसर्गामुळं ताप, नसांमध्ये सूज, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणं, घाम येणं, घसा खवखवणं आणि खोकला अशी एक किंवा त्याहून अधिक लक्षणं दिसून येतात. हा सौम्य स्वरूपाचा संसर्ग असल्याचं सध्या सांगण्यात येत असून, साधारण 2 ते 4 आठवड्यांमध्ये तो बराही होतो, ज्यामुळं भीतीचं कारण नाही. दरम्यान लहान मुलांमध्ये आणि इतर काही सहव्याधी असणाऱ्या रुग्णांमध्ये मात्र हा संसर्ग बळावू शकतो. सध्या या संसर्गाचा मृत्यूदर 3 ते 6 टक्के असल्याचं मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.