Monsoon In Kerala : ज्याची आपण सगळे वाट पाहत आहे, त्या मान्सूनची प्रतीक्षा आज संपली. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. आता केरळचा उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग आणि कर्नाटक राज्याच्या काही भागांत मान्सून पुढे वाटचाल करेल, अशी अनुकूल परिस्थिती आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमध्ये यंदा मान्सून चार दिवस उशिरा येऊ शकतो, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले होते. मात्र, जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला आहे.  दक्षिणेकडील राज्यात मान्सून सुरु होण्याची सामान्य तारीख 1 जून असते. परंतु यंदा मान्सूनचा हंगाम 4 जूनपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे. मात्र, आज मान्सून दाखल झालाय. दरम्यान, तळकोकणात 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल एक आठवडा विलंब झाला आहे. एरवी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. 



मान्सून दाखल झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सून लाबल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार असल्याने उकाड्यातून नागरिकांची सुटका होईल. जवळपास एक आठवडा उशिराने मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दरम्यान, यावर्षी मान्सून लांबण्यास बिपरजॉय चक्रीवादळ कारणीभूत ठरले आहे. या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला. या चक्रीवादळाच्या परिणामामुळेच मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे.


केरळमध्ये गेल्यावर्षी 29 मे रोजी मान्सून दाखल झाला होता. तर 2021 मध्ये 3 जून आणि 2020 मध्ये 1 जून ला दाखल झाला होता. केरळमध्ये मान्सून 2019 मध्ये उशिराने दाखल झाला. 2019 ला 8 जून केरळमध्ये मान्सूनची सुरुवात झाली होती. यावर्षीही 8 जूनला मान्सून दाखल झाला आहे. आता महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.