Monsoon in Maharashtra : मान्सूनबाबत हवामान विभागाची दिलासादायक बातमी. मान्सून कोकणाच्या वेशीपर्यंत आला असून आज कर्नाटकात धडकला. देशात यावर्षी दिलासादायक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावली आहे. 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यावर्षी 29 मे रोजीच दाखल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने मान्सूनबाबत दुसरा अंदाज जारी केलाय. यावर्षी देशात 96 टक्के ते 104 टक्के पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आलाय. मान्सून कोअर झोन म्हणजे शेती सर्वाधिक असलेल्या मध्य भारतात सामान्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. 


नांदेडमध्ये वादळीवाऱ्यासह गारपिट
नांदेड शहरातील सिडको भागाला वादळी वारासह गारपिटीचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडून काही वाहनांचे नुकसानही झालं आहे. एका कारवर आणि एका ऑटोवर झाड उन्मळून पडल्यानं वाहणांचे नुकसान झालं. वसंतराव नाईक चौकात झाड उन्मळून पडल्याने सिडकोकडे जाणारा रस्ता काही वेळ बंद झाला होता. ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी उकाडा मात्र वाढलाय. प्रचंड उकाड्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा नांदेडकर करताहेत


हिंगोली जिल्ह्यात पाऊस
हिंगोली जिल्ह्यात पावसाला सुरुवात झालीये .हिंगोली आणि सेनगाव तालुक्यातील विविध भागात जोरदार पाऊस झालाय. या पावसाने शेतीच्या कामाला वेग येणार आहे. तर दुसरीकडे  अचानक आलेल्या पावसामुळे भुईमुंगाच्या शेंगांनी भरलेली पोती भिजलीत,या शेंगा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.


सोलापुरात मुसळधार पाऊस
सोलापुरातील बार्शी शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झालाय. कडक उन्हापासून बार्शीवासियांना मोठा दिलासा मिळालाय. मान्सूनने देशात हजेरी लावलेली असताना सोलापुरातील बार्शीत मान्सून पुर्व सरी जोरदार बरसल्याने लवकरच जिल्ह्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.