भारतात या दिवशी दाखल होणार मान्सून, आयएमडीचा अंदाज
भारतामध्ये १ जूनला मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई : भारतामध्ये १ जूनला मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळमधून मान्सून भारतात दाखल होईल, असंही भारतीय हवामान खातं (आयएमडी)ने सांगितलं. कोरोनाच्या संकटात यंदाचा मान्सून अर्थव्यवस्थेला पुन्हा पटरीवर आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. १ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल व्हायला वातावरण पोषक, असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
याआधी आयएमडीने केरळमध्ये ५ जूनला मान्सून दाखल होईल, असं सांगितलं होतं. भारतातली बहुतेक शेती ही जून ते सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून असते. कोरोनामुळे तळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेसाठी यंदाचा पाऊस चांगला होणं आणि शेतीतून उत्पन्न जास्त येणं गरजेचं आहे. भारताची अर्थव्यवस्था ही आशिया खंडातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.
यंदाच्या वर्षीचा मान्सून हा सरासरी असेल. यावेळच्या मान्सूनचं प्रमाण १०० टक्के असेल, तसंच यामध्ये ५ टक्के मागे किंवा पुढे होण्याची शक्यताही आहे, हे आयएमडीने याआधीच सांगितलं होतं. त्यामुळे शेतीचं उत्पन्न जास्त होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.