Monsoon Updates : खासगी हवामान (Weather News) संस्था स्कायमेटनं पुन्हा एकदा यंदाच्या वर्षासाठी मान्सूनबद्दलची महत्त्वाची माहिती देत दक्षिण पश्चिम मान्सून केरळातूनच (Kerala Monsoon) उशिरा मार्गस्थ होणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय शेतकरी वर्गालाही स्कायमेटकडून इशारा देत आगामी शेतकामांच्या बाबतीत सतर्क करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कायमेटचे संचालक जतिन सिंग यांनी ट्विट करत दिलेल्या माहिनुसार मान्सूनची वाटचाल काहीशी उशिरानं सुरु होणार असून, सध्या जाणवणारा उकाडा थेट जूनपर्यंत जाणवणार आहे. ज्यामळं शेतीवरही मान्सून लांबल्यामुळं या परिस्थितीचे थेट परिणाम होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. स्कायमेटच्या माहितीनुसार भारतीय उपखंडात मान्सून सहसा केरळच्या किनारपट्टीवरून 1 जूनपासून प्रवास सुरु करतो. पण, यावेळी मात्र त्याचा वेग काहीसा मंदावू शकतो. 



एकिकडे स्कायमेटकडून मान्सूनबाबतची चिंता वाढवणारी बातमी समोर आली असतानाच दुसरीकडे आयएमडी अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागानं मात्र याबाबत कोणतंही निरीक्षण नोंदवलेलं नाही. किंबहुना येत्या दोन ते तीन दिवसांत आयएमडीही याबाबतचा अंदाज वर्तवणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


मान्सूनाबबत स्कायमेटकडून चिंता वाढवणारा अंदाज... 


काही दिवसांपूर्वीच मान्सूनबाबतचा प्राथमिक अंदाज वर्तवताना स्कायमेटनं यंदाच्या वर्षी मान्सून सरासरीहूनही कमी असेल असा इशारा दिला होता. तर, आयएमडीनं मात्र या दाव्याला शह देत यंदाचा मान्सून समाधानकारक असेल असं वृत्त जाहीर करत बळीराजाला दिलासा दिला होता. 


तिथं स्कायमेटकडून यंदाच्या वर्षी मान्सून लांबणीवर पडण्याचं वृत्त जाहीर केलं असतानाच इथं Vagaries of the Weather कडूनही मान्सूनच्या आगमनासाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यानुसार मुंबईत मान्सून 15 जून तर, महाराष्ट्रात 9 जूनपर्यंत पोहोचू शकतो. 


महाराष्ट्रात शासनाचा मोठा निर्णय... 


महाराष्ट्र शासनाकडून सध्याच्या घडीला अतिशय मोठा निर्णय घेत सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील निर्देशही दिले आहेत. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाला दिले. अवकाळीमुळं राज्यात आलेलं संकट आणि नुकसान पाहता आता त्या धर्तीवर नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला जाणार आहे.