रामराजे शिंदे, नवी दिल्लीः संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करण्याची रणनीती बनवलीय. यात अग्नीपथ महागाई सारखे मुद्दे घेतले जाणार आहे. शिवाय महाविकास आघाडी जाऊन एकनाथ शिंदे सरकार आले. राज्यात ४० आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठींबा दिला. आता संसदेत शिवसेना खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहतात की एकनाथ शिंदेंना कौल देतात हे या अधिवेशनात दिसून येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आजच राष्ट्रपतीपदाची निवडणूकही होणार आहे. यात द्रोपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा आमने सामने असणार आहेत. भाजपसोबत काडीमोड घेतलेल्या शिवसेनेनं ही द्रोपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला आहे.


पावसाळी अधिवेशन १८ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात एकूण २६ दिवसांच्या कालावधीत १८ सीटींग होणार आहेत. सध्याच्या संसद भवनातील हे कदाचित शेवटचं सत्र असल्याचं बोललं जात आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होईल, तोपर्यंत नवीन संसद भवन तयार केले जाईल.


या अधिवेशनात वादग्रस्त मुद्दे येणार आहेत त्यात


1. अग्निपथ योजना
2. महागाई
3. शेतक-यांचे प्रश्न
4. धार्मिक द्वेष


ठाकरें समोर आव्हान


याच मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळून एकनाथ शिंदे आणि भाजपने सरकार स्थापन केले. त्यानंतर हे संसदेचं पहिलेच अधिवेशन आहे. शिवसेना खासदारांचा एक गट एकनाथ शिंदेना पाठींबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 



या खासदारांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना पाठींबा देण्यासाठी पत्र लिहलं. हे एक प्रकारे बंड होतं. एकीकडे खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदेकडून फिल्डिंग लावली जात आहे तर दुसरीकडे खासदार टिकवून ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरें समोर असणार आहे. प्रतोपपदावरून भावना गवळी यांची हकालपट्टी करून राजन विचारे यांची नियुक्ती केली. त्यामुळे भावना गवळी नाराज आहेत. तसेच स्थानिक पातळींवर राष्ट्रवादीकडून त्रास जात असल्याच्या तक्रारीही काही खासदारांनी केलीय. महत्त्वाच्या विधेयकावेळी खासदार कोणाच्या बाजूने मतदान करणार यावरून शिवेसेनेचं संसदेतलं भवितव्य ठरणार आहे. एकंदरीतच शिवसेनेसाठी हे अधिवेशन आव्हानात्मक असणार आहे. 


शिवाय संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन डझनहून अधिक नवीन विधेयके मांडली जाऊ शकतात.  त्याचबरोबर जुन्या प्रलंबित बिलांवरही चर्चा होणार आहे.


या विधेयकांवर चर्चा होणार


1. सध्या बालविवाह प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक, 
2. राष्ट्रीय डोपिंग विरोधी विधेयक
3. भारतीय अंटार्क्टिक विधेयक
4. जैवविविधता सुधारणा विधेयक 
यासारखी महत्त्वाची विधेयके सभागृहात प्रलंबित आहेत.


लोकसभेत आधीच मांडण्यात आलेले पण समितीकडे न पाठवलेले आणखी एक विधेयकही चर्चेत येईल.  त्याचबरोबर या अधिवेशनात २४ विधेयके पहिल्यांदा मांडली जाणार आहेत आणि ती मंजूर केली जाणार आहेत.


राष्ट्रपती निवड 
संसदेचे हे अधिवेशन विशेष ठरणार आहे कारण १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.  
त्यानंतर २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.  
नवीन राष्ट्रपतींना २५ जुलै रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ दिली जाईल.


उपराष्ट्रपती निवड 
दुसरीकडे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी ६ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्वा यांचे नाव जाहीर करण्यात आले आहेत. निवडणूक बिनविरोध झाली नाही तर मतमोजणीही त्याच दिवशी होईल. हे सर्व संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच होईल