मुंबई : येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अंदमानच्या किनाऱ्यावर येऊन धडकण्यासाठी पोषक वातावरण  निर्माण झालंय. गेल्या दोन तीन दिवसात हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या प्रगतीसाठी योग्य वातावरण तयार झालंय. अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असून येत्या ४८ तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. हवामान विभागाकडून गेल्या आठवड्यात वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार २३ मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता होती.


कोकण-गोव्यामध्ये पावसाची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी २५ मे रोजी अंदमानमध्ये  दाखल होतो. यंदा मान्सूनचा आपली तारीख पाळणार असं चित्र आहे. यंदा मान्सून केरळमध्ये २९ मे रोजी दाखल होणार आहे. यामुळे मान्सून महाराष्ट्रातही लवकर दाखल होणार आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात काल रिमझिम पाऊस पडला असून मुंबईतही ढगाळ वातावरण निर्माण झालय. मे महिन्यात अशाप्रकारे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं मुंबईकरांना हायस वाटलं. दरम्यान, शनिवारी दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.


तीव्र चक्रीवादळ अरबी समुद्रात


मान्सून सध्या दक्षिण अंदमानकडे वाटचाल करत आहे. याच कालावधीमध्ये मिकुनू हे तीव्र चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले आहे. मात्र मिकुनू हे चक्रीवादळ नैऋत्येकडे ओमानच्या दिशेने सरकत असल्याने या चक्रीवादळाचा अंदमानमध्येही न धडकलेल्या मान्सूनच्या प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता नाही, असे प्रादेशिक हवामान विभागाचे मुख्य प्रवक्ते विश्वंभर सिंग यांनी म्हटलेय.


मान्सूनचा पुढचा प्रवास  


मान्सूनची कशा पद्धतीने सक्रीय होत आहे यावर मान्सूनचा पुढचा प्रवास अवलंबून आहे. केरळ जवळही पाऊस आहे. त्याचप्रमाणे दक्षिण द्वीपकल्पाजवळ ढगांची गर्दी असल्याने मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलाय. गुरुवारी सकाळी झालेल्या नोंदणीनुसार मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण आणि गोव्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.