नवी दिल्ली : 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर जैश ए मोहब्बतला पाठिशी घालणाऱ्या पाकिस्तानचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. देशभरात पाकिस्तानचे झेंडे जाळून, पाक विरोधी घोषणा देऊन भारतीय जनतेने आपला राग व्यक्त केला. भारत सरकारनेही पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानला दिला जाणारा विशेष राष्ट्राचा दर्जा काढून टाकण्यात आला आहे. तर पाकिस्तानला केल्या जाणाऱ्या निर्यातीवर 200 टक्के कर लावण्यात आला आहे. पाकिस्तानला जाणारे पाणीही रोखण्याचे प्रयत्न सुरू असून वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्हच आहे. या सर्वात टाईल्स निर्मात्या व्यापाऱ्यांनी अजब प्रकारे आपला निषेध नोंदवला आहे. सार्वजनिक शौचालयात लागणाऱ्या टाईल्सवर पाकिस्तानचा झेंडा लावण्यात आला आहे. त्यावर पाकिस्तान मुर्दाबाद असे लिहिण्यात आले आहे. असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 



पाकिस्तान बद्दल सध्या जनतेमध्ये राग आहे. तो राग यातून व्यक्त केला जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. जसजशी या टाईल्सची मागणी वाढेल तसे उत्पादन वाढवणार असल्याचे टाईल्स कारखान्याचे मालक सुरेश कौसुंदरा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. पण इतर कुठून मागणी आली तर आम्ही या टाईल्स मोफत देण्यासही  तयार असल्याचे त्यांनी सांगितले. या कृतीतून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे टाईल्स बनवणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले.