जम्मू: जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात सुमारे 50 सरपंचांनी एकत्रितपणे राजीनामे दिले आहेत. या पंचांनी सरकारच्या अनेक योजनांमध्ये सहभाग न मिळाल्याने आणि अधिकाऱ्यांच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे हे पाऊल उचललं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बनिहाल आणि रामसू ब्लॉकच्या सुमारे 50 सरपंच आणि पंचांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेतली. यानंतर, ब्लॉक विकास परिषदेच्या अध्यक्षांना भेटून त्यांचा राजीनामा सादर केला. सरपंच गुलाम रसूल मट्टू, तन्वीर अहमद कटोच आणि मोहम्मद रफिक खान यांनी आरोप केला की, सरकारने त्यांना दिलेली आश्वासने अजूनही कागदावर लटकलेली आहेत.


अधिकाऱ्यांनी सहकार्य न केल्याचा आरोप


प्रशासकीय यंत्रणा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असून गावाच्या विकासकामांमध्ये विनाकारण हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सरकारी योजनांमध्ये ग्रामसभांना वाटा देण्याचे आश्वासन क्रूर विनोद असल्याचे सिद्ध होत आहे. पंच म्हणाले की, केंद्र सरकारचे मंत्री राज्यात भेटीसाठी येतात, परंतु स्थानिक अधिकारी स्थानिक प्रतिनिधींना भेटू देत नाहीत. निवडक लोकांचा एक गट बनवून त्यांची ओळख करून दिली जाते. यामुळे पंचायती राज व्यवस्था यशस्वी होत नाही.


पंच-सरपंचांचे मन वळवण्यात गुंतले अधिकारी


इतक्या मोठ्या संख्येने सरपंचाच्या राजीनाम्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. रामबन जिल्ह्याचे जिल्हा पंचायत अधिकारी अशोक सिंह यांनी विरोध करणाऱ्या पंचांसोबत बैठक घेऊन त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी आश्वासन दिले आहे की त्यांच्या सर्व तक्रारी लवकरच सोडवल्या जातील.