बुडलेल्या मुलाला वाचवायला गेले आणि डझनभर लोकं विहिरीत कोसळले!
मुलाला वाचवण्यासाठी विहिरीबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली आणि गर्दीमुळे विहिरीचा कठाडाच तुटला
मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातल्या विदिशा जिल्ह्यातल्या गंजबासोदा भागात दोन डझनहून अधिक लोक खोल विहिरीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 20 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एक 14 वर्षांचा मुलगा विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी विहिरीबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली. गर्दीमुळे विहिरीचा कठाडा तुटला आणि अनेक लोक खोल विहिरीत कोसळले. आतापर्यंत 20 लोकांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
अजूनही पाच जण विहिरीत अडल्याची माहिती असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत.