भारताच्या अर्थव्यवस्थेला `अच्छे दिन`! चीन मात्र दीन; Morgan Stanley कडून रँकिंग जाहीर
Morgan Stanley Upgrades India Status: काही महिन्यांपूर्वीच या जागतिक स्तरावरील कंपनीने भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा केली होती. आता पुन्हा एकदा भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा केली असून ही बाब भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहे.
Morgan Stanley Upgrades India Status: अमेरिकी बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी असलेल्या 'मॉर्गन स्टॅन्ले'ने भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा केली आहे. भारताला आता 'ओव्हरवेट' असं रँकिंग दिलं आहे. देशात सुरु असलेले बदल आणि सूक्ष्म पातळवरील आर्थिक घडी बसवण्यासंदर्भातील प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर भारताला भविष्यात चांगले परिणाम मिळू शकतात असं या कंपनीचा अंदाज आहे. भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात उत्तम कामगिरी करेल असं कंपनीला वाटत असल्यानेच भारताला 'ओव्हरवेट' रँक देण्यात आला आहे. विशेष म्हणजे दुसरीकडे आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचा AAA दर्जा काढून टाकण्याबरोबरच चीनमधील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थव्यवस्थेकडून अपेक्षा असल्याचं सांगणं हे फार महत्त्वाचं मानलं जात आहे. त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन' आणि चीन मात्र दीन असाच या अहवालाचा कल दिसत आहे.
भारताबद्दल 'मॉर्गन स्टॅन्ले'ने काय म्हटलं आहे?
भारताच्या अर्थवस्थेसंदर्भातील निर्देशक हे स्थीर आहेत. भारताचा जीडीपी 6.2 टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. "भारत आमच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 6 व्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर आला आहे. ऑक्टोबरमधील अपेक्षित आकडेवारी ही स्थीर असेल. भारताकडे असलेली सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेवर बहुअंगी परिणाम करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे," असं 'मॉर्गन स्टॅन्ले'ने म्हटलं आहे.
चीनबद्दल व्यक्त केली चिंता
"भारतामध्ये (आर्थिक घडामोडींची) नवीन लाट येणार आहे तर दुसरीकडे चीनमधील हीच लाट समाप्तीच्या दिशेने आहे," असंही 'मॉर्गन स्टॅन्ले'च्या अहवालात म्हटलं आहे. भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा करतानाच दुसरीकडे चीनसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. गुंतवणुकदारांनी नफा मिळविण्यासाठी सरकारी प्रोत्साहनाचा फायदा घ्यावा, असा सल्ला कंपनीने चिनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना दिला आहे.
चीनचे प्रयत्न अपुरे
बिजींगकडून गुंतवणूक वाढीला चालना देण्यासाठी आणि देशाच्या खाजगी क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनेक आश्वासनं दिली जात आहेत. या आश्वासनांमुळे अलीकडच्या काही दिवसांत चीनमधील आर्थिक व्यवहारांना चालना मिळाली आहे. मात्र चीनसंदर्भातील आर्थिक व्यवहार सुरळीत होण्याची प्रक्रिया ही तुकड्यांमध्ये होईल अशी दाट शक्यता आहे. चीनमधील धोरणांमध्ये अधिक बदल अपेक्षित आहेत. मात्र हे बदल शेअर्सच्या माध्यमातून नफा मिळवण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीत असा अंदाज आहे.
भारताकडून बरीच अपेक्षा
काही महिन्यांपूर्वीच मॉर्गन 'स्टॅन्ले'ने भारताचं रँकिंग 'अंडरवेट' वरुन 'इक्वलवेट' करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा हे रँकिंग सुधारण्यात आल्याने भारतीय अर्थव्यवस्थेकडून जगाला फार अपेक्षा असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.