आईने धान्य आणायला घराबाहेर पाठवले, मुलगा बायको घेऊन परतला
कोणतीही कल्पना न देता पत्नीला घरी आणल्यामुळे आई त्याच्यावर भलतीच संतापली
गाझियाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि तातडीच्या कामांसाठी अगदीच गरज पडली तरच नागरिक रस्त्यावर येतील, याची काळजी पोलीस घेत आहेत. मात्र, बुधवारी उत्तर प्रदेशाच्या साहिबाबाद पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या महिलेमुळे पोलीस चक्रावून गेले. ही महिला आपल्या मुलाची तक्रार घेऊन पोलिसांकडे आली होती. आपण मुलाला धान्य आणण्यासाठी घराबाहेर पाठवले आणि मुलगा बायकोला घेऊन घरी परतला. मला हे लग्न मान्य नाही. तेव्हा आता काहीतरी करा, असा धोशा या महिलेने लावल्याने पोलीस बुचकाळ्यात पडले आहेत.
या महिलेचा मुलगा गुड्डू हा २६ वर्षांचा आहे. कोणतीही कल्पना न देता पत्नीला घरी आणल्यामुळे आई त्याच्यावर भलतीच संतापली आहे. गुड्डूने या सगळ्याचा खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, मी दोन महिन्यांपूर्वी हरिद्वारच्या आर्य समाज मंदिरात सविताशी लग्न केले होते. मात्र, त्यावेळी कोणीही साक्षीदार नसल्यामुळे आम्हाला विवाहाचे प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) मिळाले नव्हते. मी हरिद्वारला जाऊन पुन्हा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करणारच होतो. मात्र, तितक्यात देशभरात लॉकडाऊन घोषित झाला.
आम्ही हरिद्वारहून लग्न करून परतल्यानंतर सविता दिल्लीतील तिच्या भाड्याच्या घरातच राहत होती. मात्र, लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर घरमालकाने तिला खोली खाली करायला सांगितली. त्यामुळे मी सविताला माझ्या घरी आणण्याचा निर्णय घेतला, असे गुड्डूने सांगितले. मात्र, आता काही केल्या गुड्डूची आई ऐकायला तयार नाही. त्यामुळे पोलिसांनी सविताच्या घरमालकाला लॉकडाऊन संपेपर्यंत विवाहित जोडप्याला घरात राहून द्यावे, असे बजावले आहे.