आईचा कोरोनामुळे मृत्यू, गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर 80 जणांकडून बलात्कार
Corona मुळे पीडित मुलीच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी महिलेने मुलीला दत्तक घेत असल्यांचं सांगत आपल्या घरी नेलं होतं.
मुंबई : आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर 80 जणांनी बलात्कार केला. 8 महिने अल्पवयीन मुलीसोबत हे घृणास्पद कृत्य सुरूच होते. वास्तविक अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवार, १९ एप्रिल रोजी गुंटूर येथून अल्पवयीन मुलीची सुटका केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी माहिती दिली की, जून 2021 मध्ये कोविड-19 महामारीच्या काळात आरोपी महिलेची हॉस्पिटलमध्ये पीडितेच्या आईशी ओळख झाली. आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी महिलेने अल्पवयीन मुलीला तिच्या घरी आणले. पीडितेला दत्तक घेते असं सांगितलं गेलं पण नंतर तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.
ऑगस्ट 2021 मध्ये मुलीच्या वडिलांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी मुख्य आरोपीची ओळख पटवली. याप्रकरणी पहिली अटक जानेवारी महिन्यात झाली होती. मंगळवार 19 एप्रिल रोजी गुंटूर पश्चिम विभाग पोलिसांनी बी. टेक विद्यार्थ्यासह आणखी 10 जणांना अटक केली. आरोपी आणि पीडितेची चौकशी केल्यावर पोलिसांना पीडितेच्या स्थितीतील वेदनादायक आणि धक्कादायक वास्तव समोर आले.
या प्रकरणी आगामी काळात आणखी अटक होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. एक आरोपी सध्या लंडनमध्ये आहे. याप्रकरणी एक कार, ५३ मोबाईल, तीन ऑटो आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही.