पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही मोटर वाहन कर माफ करा, मनसेची मागणी
मोटर वाहन कर, पार्कींग शुल्क माफ करा अशा मागण्या करण्यात आल्या
मुंबई : करोनाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षावाले, टॅक्सीवाले, खासगी बसेस आणि जड वाहनांच्या लहान-मोठ्या कंपन्या, ही वाहनं चालवणारे ड्रायव्हर्स, क्लिनर्स अशा सर्वांवरच परिणाम झालायं. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिपत्रक काढून परिवहन विभागाकडे काही मागण्या केल्या आहेत. पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही मोटर वाहन कर, पार्कींग शुल्क माफ करा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना यासंदर्भात एक पत्र लिहीले आहे.
पंजाब सरकारने १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या वाहनांवरील ‘मोटर वाहन कर’ (Motor Vehicle Tax) माफ केलेला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही‘मोटर वाहन कर’ माफ व्हायलाच हवा अशी मागणी मनसेने केली आहे. हा कर माफ केल्यास स्टेज कॅरेज बसेस, टुरिस्ट बसेस, शाळा बसेस, मिनी बसेस, मॅक्सी कॅब, तीन चाकी वाहनं, मालवाहतुकीची वाहनांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील खासगी बस वाहतूक गेले दोन महिने संपूर्ण बंद असतानाही त्यांना भरावा लागणारा कर माफ केलाच पाहिजे. करोना टाळेबंदीच्या काळासाठी तरी हे पार्किंग शुल्क माफ करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही होणं गरजेचं आहे.खासगी प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध उठवण्याबाबत सरकारने तत्काळ नवीन नियमावली बनवायला हवी.
हफ्तेखोरीला चालना देणारी राज्यातील ही अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सरकारने अधिकृत प्रवासी वाहतुकीला चालना देणं गरजेचं आहे. पासिंग शुल्क भरु न शकलेल्यांना आर्थिक दंड आकारु नये.
अपघात झाल्यास त्याचा नुकसान भरपाईचा दावा ग्राह्य धरण्याबाबत विमा कंपन्यांना योग्य ते आदेश देण्याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
राज्य परिवहन मंत्रालयाने वाहतूक संघटनांना विश्वासात घेऊन युद्ध पातळीवर उपायोजनांचा आराखडा आखणे गरजेचे असल्याचे यात म्हटले आहे.
तसेच वाहतूक क्षेत्राला अल्पकालीन आणि दीर्घकालीन दिलासा देण्यासाठी ‘एकात्मिक आर्थिक पॅकेज’ची गरज असून त्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचलावीत अशी मागणी देखील मनसेने केली आहे.