`या` वाहनांना पुढे जाण्याचा मार्ग न दिल्यास 10000 रुपये दंड, जाणून घ्या
रस्त्यावरून वाहनाने प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक आहे. कारण वाहतुकीचे नियम न पाळता गाडी चालवल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.
मुंबई: रस्त्यावरून वाहनाने प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक आहे. कारण वाहतुकीचे नियम न पाळता गाडी चालवल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. एवढेच नाही तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याला तुरुंगवासही होऊ शकतो. कधी कधी नकळत तुमच्या हातून नियमांचं उल्लंघन होऊ शकतं. अनेकदा लोकांना नियमांची माहिती नसते आणि ते नकळत वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका वाहतूक नियमाबद्दल सांगणार आहोत. या वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
आपत्कालीन वाहनांना मार्ग द्या
हा नियम आपत्कालीन वाहनांना मार्ग देण्याशी संबंधित आहे. सध्याच्या वाहतूक नियमांनुसार, कोणत्याही मोटार वाहन चालकाने आपत्कालीन वाहनांना पुढे जाण्यासाठी मार्ग देणे आवश्यक आहे. म्हणजेच, तुमच्या मागे एखादे आपत्कालीन वाहन असेल, तर ताबडतोब पुढे जाण्यासाठी मार्ग करून द्यावा. असं न केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. असे करताना पकडले गेल्यास दंड आकारण्यात येईल.
सुधारित मोटार वाहन कायद्याच्या कलम 194(ई) अंतर्गत चलन कापले जाईल
अग्निशमन दल, रुग्णवाहिका अशा आपत्कालीन वाहनांना मार्ग देणे बंधनकारक आहे. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 अंतर्गत, वाहनचालकांना आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. सुधारित मोटार वाहन कायद्याच्या कलम 194 (ई) अंतर्गत चलन कापले जाईल. या नियमात अग्निशमन दल किंवा रुग्णवाहिका यांसारख्या आपत्कालीन सेवांच्या वाहनांना मोकळा रस्ता न दिल्याबद्दल दंडाचा उल्लेख आहे.