नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच्यादृष्टीने भारत योग्य दिशेने वाटचाल करत आहे. आता सर्व राज्यांनी एकजुटीने काम केले तर आपण कोरोनावर मात करु, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. त्यांनी मंगळवारी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशातील कोरोनाचे ८० टक्के रुग्ण या दहा राज्यांमध्ये आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची विनंती केली. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ५३,६०१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ८७१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २२,६८, ६७६ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज व्यक्त केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत मांडलेले प्रमुख मुद्दे
* देशात आता प्रत्येक दिवशी ७ लाख कोरोना चाचण्या होत असून ही संख्या आणखी वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा शोध घेण्याबरोबरच संक्रमण रोखण्यात मोदी मदत होईल. जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडील मृत्यूदर कमी आहे. यामध्ये आणखी घसरण होत आहे, ही समाधानाची बाब आहे. 
* ज्या राज्यांमध्ये कोरोना चाचण्या कमी प्रमाणात होत आहेत व पॉझिटिव्ह रेट जास्त आहे, अशा ठिकाणी चाचण्यांची संख्या वाढली पाहिजे. विशेषत: बिहार, गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये या गोष्टीवर अधिक भर दिला पाहिजे. 
* कोरोनाला रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेन्मेंट आणि सर्वेक्षण हेच प्रभावी मार्ग आहेत. ही गोष्ट आता जनतेच्या लक्षात आली असून त्यांच्याकडून सहकार्य मिळत आहे.