कपल्ससाठी 99 रुपयांत किसिंग केबिन! कॅफेच्या ऑफरने नवा वाद
Private Cabin Cafe : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका कॅफेची जाहिरात सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोकांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी कॅफेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केफेचा मालक सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत
Viral News : या जगात नि:स्वार्थी लोकांची कमी नाहीये. आताही लोक एखादी बाईक जाताना दिसली आणि त्याचा स्टॅंण्ड खाली आलेला दिसला की लोक ओरडून ओरडून त्या बाईकस्वाराला तो वर घ्यायला लावतात. रस्त्यावरुन जातानाही अनेक वृद्धांचीही सहज मदत केल्याचे अनेकांनी पाहिलं असेल. मध्य प्रदेशातल्या (MP News) इंदूर शहरातही तुम्हाला अनेक निःस्वार्थी लोक सापडतील. अशाच एकाने प्रेमी युगुलांसाठी एक ऑफर ठेवून आपला स्वार्थ साधला आहे. या व्यक्तीने त्याच्या कॅफेमध्ये (Indore Private Cabin Cafe) दिलेल्या ऑफरमुळे मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. मात्र आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं आहे.
ब्लू बॉटल कॅफे (BBC) नावाचा हा कॅफे चालवणाऱ्याने प्रेमी युगुलांसाठी एक अफलातून योजना शोधून काढली होती. हा कॅफे चालवणाऱ्याने चुंबन घेण्यासाठी प्रेमी युगुलांना फक्त 99 रुपयांमध्ये एका तासासाठी खाजगी केबिन देण्याची ऑफर आणली होती. कॅफेच्या मालकाने यासंदर्भात एक जाहिरात काढून लोकांना याची माहिती देखील दिली. जर तुम्हाला चुंबन घेण्याची जागा मिळत नसेल तर ब्लू बॉटल कॅफेमध्ये या आणि किसिंग केबिनची सेवा घ्या, असे या जाहिरीतामध्ये म्हटलं आहे. पण आता किसिंग केबिन आणि त्याच्या जाहिरातीवरून मोठा वाद झाला आहे. या जाहिरातीवर अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर छत्रीपुरा पोलिसांनी जंगमपुरा येथील रहिवासी असलेल्या बीबीसी कॅफेचे संचालक दीपेश जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे जाहिरातीच्या व्हिडीओमध्ये?
या व्हिडिओमध्ये प्रेमी जोडप्याला 99 रुपये प्रति तास या दराने खासगी बसण्याची केबिन उपलब्ध करून देण्याबाबत दाखवले होते. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. छत्रीपुरा पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर ब्लू बॉटल कॅफे (BBC) कॅफे चालवला जात होता. जिथे प्रेमी युगलांसाठी 99 रुपये प्रति तास या दराने खासगी केबिनमध्ये कपलच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपं सार्वजनिक ठिकाणी बसलेलं होतं. मुलगी त्या मुलाला म्हणते की आता आपण चुंबन घेऊ शकतो. यानंतर दोघे चुंबन घेण्यासाठी एकांत शोधू लागतात. दोघे लिफ्टमध्ये जातात, पण तिथे कोणीतरी येते. मग दोघेही ऑटोमध्ये बसतात, इथेही ऑटोचालक त्यांना पाहत राहतो. मग ते दोघेही या कॅफेमध्ये जाताना दिसतात.
दरम्यान, या कॅफेचे संचालक दिपेश जैन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर संतप्त लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी दीपेशविरुद्ध अश्लीलता पसरवल्याप्रकरणी कलम 292अ अंतर्गत गुन्हा दाखल केला. "ब्लू बॉटल कॅफेच्या ऑपरेटरने इन्स्टाग्रामवर जाहिरात प्रसिद्ध केली होती. प्रेमी युगुलांना अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त केले जात होते, त्यावर पोलिसांनी कारवाई केली. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले मात्र तो फरार झाला आहे," अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त अभिनय विश्वकर्मा यांनी दिली.